रांगा इथल्या संपतच नाहीत

वृत्तसंस्था
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - काळा पैसा रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याच्या निर्णयास आठवडा लोटल्यानंतरही सर्वसामान्य नागरिकांची नोटा बदलून घेण्यासाठी सुरू असलेली परवड थांबलेली नाही. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेकडून दररोज उपाययोजना केल्या जात असल्या तरी, स्थिती अद्याप आटोक्‍यात आलेली नाही. त्यामुळे जुन्या नोटा जमा करण्यासाठी आणि नवीन नोटा घेण्यासाठी बॅंकांसमोरील रांगेचे चित्र आजही सहाव्या दिवशी दिसले.

नवी दिल्ली - काळा पैसा रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याच्या निर्णयास आठवडा लोटल्यानंतरही सर्वसामान्य नागरिकांची नोटा बदलून घेण्यासाठी सुरू असलेली परवड थांबलेली नाही. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेकडून दररोज उपाययोजना केल्या जात असल्या तरी, स्थिती अद्याप आटोक्‍यात आलेली नाही. त्यामुळे जुन्या नोटा जमा करण्यासाठी आणि नवीन नोटा घेण्यासाठी बॅंकांसमोरील रांगेचे चित्र आजही सहाव्या दिवशी दिसले. दरम्यान, नोटा बदलताना बोटांना शाई लावण्यात येणार असून, अचानक मोठ्या रकमा जमा झालेल्या जन धन खात्यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर जनतेला दिलासा देण्यासाठी सरकारकडून उपाययोजनांचा भडीमार सुरू असला तरी, नव्या नोटांअभावी आठवडाभरानंतरही सर्वसामान्य जनतेची होरपळ सुरूच आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आर्थिक व्यवहार खात्याचे सचिव शक्तिकांत दास यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन बॅंकांमधील गर्दी कमी करण्यासाठीच्या नव्या उपायांची माहिती दिली. नव्या नोटांचा रंग जाण्यावरून निर्माण झालेला संभ्रमही दूर करण्याचा प्रयत्न दास यांनी केला. तसेच, बॅंक कर्मचारी संपावर जाणार असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल होणारे संदेश म्हणजे निव्वळ अफवा असल्याचेही स्पष्टीकरण त्यांनी दिले. 

शक्तिकांत दास म्हणाले, जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी काळा पैसाधारकांचे गट सक्रिय झाले असून, तेच वारंवार बॅंकांमध्ये येत आहेत. यामुळे गरजूंना पैसे मिळण्यात अडथळे येत आहेत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी आता बॅंकेत नोटा बदलून देताना संबंधित व्यक्तीच्या हातावर दीर्घकाळ टिकून राहणारी शाई लावली जाईल. यामुळे अशा व्यक्ती पुन्हा पुन्हा बॅंकेत येऊ शकणार नाहीत. नोटा टंचाईमुळे मिठासारख्या जीवनावश्‍यक वस्तूंची दरवाढ सुरू झाल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र, तसे काहीही झालेले नाही. या केवळ अफवा आहेत. ‘जन धन’ खातेधारकांनी इतर कोणालाही त्यांच्या खात्यात पैसे भरण्यासाठी परवानगी देऊ नये. ‘जन धन’ खात्यांमध्ये पैसे भरण्याची मर्यादा ५० हजार रुपयांची आहे. ज्या खात्यांमध्ये एकाच वेळी ४९ हजार रुपये जमा करण्यात आले आहे, अशा खात्यांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. 

बॅंकांमध्ये मायक्रो एटीएम यंत्रणा सुरू करण्यात येत आहे. तेथील ‘ग्रीन चॅनल’द्वारे डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डद्वारे पैसे काढता येतील. यासोबतच, बनावट नोटा चलनात येऊ नये, यासाठीही सरकारने खबरदारी घेतली आहे, असे शक्तिकांत दास यांनी सांगितले.

तक्रारी आल्यास कारवाई  

दरम्यान, जुन्या नोटा स्वीकारणे सरकारी रुग्णालयांसाठी बंधनकारक आहे. जुन्या नोटा नाकारणाऱ्या सरकारी रुग्णालयांविरुद्ध तक्रार आल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल, असा इशारा दास यांनी दिला, तर नोटा टंचाईमुळे विवाह सोहळे खोळंबल्याच्या प्रश्‍नाला उत्तर देताना आर्थिक व्यवहार सचिवांनी, अशा कार्यक्रमांसाठी धनादेश वापरावेत अशी सूचना केली. 

सरकारचे नवे निर्णय

मतदान प्रक्रियेप्रमाणेच आता बॅंकेत नोटा बदलताना बोटावर शाई लावली जाणार

एटीएममधून ५०० च्याही नोटा मिळतील, या पूर्वी केवळ १०० आणि २००० च्याच नोटा मिळत होत्या.

बॅंक कर्मचारी संपावर जाणार असल्याचे सोशल मीडियावरील संदेश म्हणजे निव्वळ अफवा

धार्मिक स्थळांकडे येणाऱ्या लहान नोटा त्वरित बॅंकांमध्ये जमा केल्या जाव्यात

दिवसभरात

देशभरात ‘एटीएम’मधील रोकड अल्पावधीत संपली

दिल्लीतील बहुतांश ‘एटीएम’ मशिन नादुरुस्त

लोकांच्या सोयीसाठी अनेक बॅंकांची मोबाईल एटीएम सेवा

मोदींचा सूट घेणाऱ्या व्यापाऱ्याकडून सहा हजार कोटी जमा

सोने, हिरे व्यापाऱ्यांवर पुन्हा कारवाईची शक्‍यता

रेल्वे तिकीट रद्द झाल्यानंतर ५ हजारांपेक्षा अधिक रिफंड खात्यात

नोटाबंदीवरून दिल्ली विधानसभेत गोंधळ

‘रंग जाणाऱ्या नोटाच खऱ्या’

नोटांच्या रंग जाण्याबाबत खुलासा करताना आर्थिक व्यवहार खात्याचे सचिव शक्तिकांत दास म्हणाले की, नोटा छपाईसाठी इंटाग्लिओ शाई वापरली जाते. रंग जाणे हे या शाईचे वैशिष्ट्यच आहे. नव्या नोटा घासून पाहिल्यास त्यांचा रंग जाताना दिसेल. त्यामुळे रंग जाणाऱ्या नोटा या खऱ्या आहेत. रंग जात नसेल तर नोटा खोट्या आहेत, हे समजावे असेही ते म्हणाले.

सेन्सेक्‍स ५१४ अंशांनी घसरला

मुंबई : देशातील पाचशे व हजारांची नोटाबंदी व डॉलरच्या तुलनेत रुपयात झालेल्या घसरणीचा शेअर बाजाराला फटका बसला. दिवसअखेर सेन्सेक्‍स ५१४ अंशांच्या घसरणीसह २६,३०४.६३ पातळीवर बंद झाला; तर निफ्टी १८७ अंशांनी घसरून ८,१०८.४५ पातळीवर बंद झाला. या घसरणीसह सेन्सेक्‍स सहा महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेला.

परीक्षा शुल्क भरण्याच्या मुदतीत वाढ 

मुंबई ः दहावी आणि बारावीच्या सुमारे २२ लाख विद्यार्थ्यांना परीक्षांचे अर्ज भरताना नोटांची अडचण येत आहे. त्यामुळे राज्य सरकारने आधी परीक्षेचा अर्ज भरा आणि नंतर शुल्क द्या, अशी सवलत दिली आहे. 

शुल्क भरण्यास मुदतवाढही देण्यात आली आहे. विद्यार्थी नोटांच्या अडचणीमुळे परीक्षेला मुकणार नाहीत, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले. दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना जुन्या नोटांच्या अडचणीमुळे शुल्क भरता येत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. 

आरबीआयची सहकारी बॅंकांना विचारणा 

जुन्या नोटा जमा करण्यास घातलेल्या बंदीच्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत रिझर्व्ह बॅंकेने सहकारी बॅंकांना मंगळवारी विचारणा केली आहे. याचबरोबर जुन्या नोटांचा भरणा करून घेण्याबाततही निर्देश रिझर्व्ह बॅंकेने दिले आहेत. दरम्यान, रिझर्व्ह बॅंकेच्या या निर्णयाने शेतकरी मात्र हवालदिल झाले आहेत. नोटाबंदीच्या निर्णयाने जिल्हा सहकारी बॅंकांमधील सर्वच व्यवहार ठप्प झाले असून, शेती व्यवसायाला याचा तोटा सहन करावा लागत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: general public continues to change currency