
ओवेसींनी 150 सदस्य संख्या असलेल्या महापालिकेत केवळ 51 जागांवर उमेदवार उतरवले होते. यातील 44 जागांवर विजय नोंदवण्यात त्यांना यश आले.
नवी दिल्ली- संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या आणि भाजपने अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेच्या (जीएचएमसी) निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) सर्वाधिक 56 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. परंतु, त्यांना बहुमत मिळू शकलेले नाही. भाजपने जबरदस्त मुसंडी मारत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसींचा पक्ष एमआयएमने 44 जागा मिळवल्या तर काँग्रेसला मात्र दोनच जागा मिळाल्या आहेत.
आकडेवारीवर नजर टाकल्यास ओवेसींच्या पक्षाचा स्ट्राइक रेट सर्वात चांगला आहे. ओवेसींनी 150 सदस्य संख्या असलेल्या महापालिकेत केवळ 51 जागांवर उमेदवार उतरवले होते. यातील 44 जागांवर विजय नोंदवण्यात त्यांना यश आले. म्हणजे ओवेसींचा स्ट्राइक रेट 86 टक्क्यांपेक्षा जास्त राहिला. तर टीआरएसला गतवेळीपेक्षा 33 जागा कमी मिळाल्या आहेत. मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या टीआरएसला 2016 मधील निवडणुकीच्या तुलनेत 40 टक्के जागा कमी मिळाल्या आहेत.
हेही वाचा- 'भाजपची लाट वगैरे काही नाही; तेलंगणा भाजपला जरुर रोखेल'
2016 च्या जीएचएमसी निवडणुकीत सत्ताधारी तेलंगणा राष्ट्रीय समितीने 99 जागा जिंकल्या होत्या आणि महापौरपद मिळवले होते. तेव्हा भाजपला अवघ्या 4 आणि ओवेसींच्या एमआयएमला 44 जागा मिळाल्या होत्या. भाजपने आक्रमक प्रचार करत हिंदू कार्ड खेळत हैदराबादमध्ये जबरदस्त विजय नोंदवला आणि आपली ताकद 12 पट वाढवली. 2018 मध्ये 117 जागांसाठी झालेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत भाजपने 100 उमेदवार उभे केले होते. मात्र, त्यांचे केवळ दोन आमदार विजयी झाले होते. मात्र, दोन वर्षांत पक्षाने दक्षिणेकडील राज्यात मुसंडी मारली आहे. 2023 च्या निवडणुकीत भाजप टीआरएससमोर मोठे आव्हान उभा करु शकतो.
हेही वाचा- GHMC Election: हैदराबादमध्ये भाजपची लांब उडी, 4 वरुन थेट 48
हैदराबाद महापालिका आता त्रिशंकू अवस्थेत आली आहे. त्यामुळे आता हैदराबादचा महापौर कोणत्या पक्षाकडे असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपने टीआरएसचे प्रचंड नुकसान केले आहे. 2023 च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांना धोका आहे. त्यामुळे टीआरएस महापौरपदासाठी भाजपला साथ देण्याची शक्यता कमी आहे. दुसरीकडे ओवेसींनी निकाल समोर येताच टीआरएसला पाठिंबा देण्याचे सूचक वक्तव्य केले आहे.