GHMC Election: हैदराबादमध्ये भाजपची लांब उडी, 4 वरुन थेट 48

bjp main.jpg
bjp main.jpg

हैदराबाद- ग्रेटर हैदराबाद महापालिका निवडणुकीत भाजपने आपली ताकद पणाला लावली होती. त्याचा परिणाम निकालात पाहायला मिळाला आहे. भाजपने जबरदस्त मुसंडी घेत तब्बल 48 जागा जिंकल्या. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी टि्वट करुन भाग्यनगरच्या भाग्योदयास प्रारंभ होत असल्याचे म्हटले आहे. गत निवडणुकीत 4 जागा जिंकणाऱ्या भाजपने थेट 48 वर उडी घेतली आहे. 

हैदराबाद महापालिका निवडणुकीत सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) 99 जागांवरुन 55 जागांवर घसरली. यावेळी टीआरएसला मोठा फटका बसला आहे. तर असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमने 44 जागा जिंकून तिसरे स्थान पटकावले आहे. तर भाजपने 48 ठिकाणी विजय नोंदवला आहे. काँग्रेसला तर केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. 

4 वरुन थेट 48 जागांवर भाजप विजयी

वर्ष 2016 मध्ये हैदराबाद महापालिका निवडणुकीत भाजपने केवळ 4 जागांवर विजय मिळवला होता. परंतु, यावेळी त्यांनी 12 पट अधिक जागा मिळवल्या आहेत. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत आहे. दरम्यान, हैदराबाद महापालिकेच्या 150 जागांसाठी 1 डिसेंबर रोजी निवडणूक झाली होती. यातील 149 जागांचे निकाल जाहीर झाले. एका वॉर्डच्या मतमोजणीला उच्च न्यायालयाची स्थगिती आहे. त्यामुळे तेथील मतमोजणी झालेली नाही. 

या निवडणुकीत टीआरएसने 150 जागांवर तर भाजपने 149 जागांवर उमेदवार उभे केले होते. त्याचबरोबर काँग्रेस 146 ठिकाणी, टीडीपी 106, एमआयएम 51, सीपीआय 17, सीपीआय (एम) 12, राज्यातील इतर नोंदणीकृत पक्षाचे 76 आणि अपक्ष 415 असे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीत एकूण 1122 उमेदवार उभे होते. 

हैदराबाद निवडणुकीसाठी प्रभारी नियुक्त करण्यात आलेले भूपेंद्र यादव म्हणाले की, निवडणुकीचे निकाल अत्यंत उत्साहवर्धक आहेत. भाजपचे मनोबल वाढवणारे हे निकाल आहेत. पक्षाचा हा एक नैतिक विजय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि सुशासनाचे मॉडेल स्वीकार्य असल्याचे निकालावरुन दिसून येते. भाजप या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जेपी नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदींबरोबर देशातील दिग्गज नेते प्रचारासाठी हैदराबादला आले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com