हुरियतचे अध्यक्ष गिलानी, मिरवाइझ नरजकैदेत

वृत्तसंस्था
रविवार, 16 एप्रिल 2017

जम्मू काश्‍मीर लिबरेशन फ्रन्टचे अध्यक्ष यासिम मलिक यांच्यावर कोणताही प्रतिबंध नव्हता त्यांना एक महिन्यानंतर काल अटक करण्यात आली.

श्रीनगर : सुरक्षा दलांच्या गोळीबारात युवक ठार झाल्याच्या निषेधार्थ आज काश्‍मीरमध्ये बंद पाळण्यात आला, तर दुसरीकडे हुरियत कॉन्फरन्सचे अध्यक्ष सय्यद अली शहा गिलानी आणि मिरवाइझ मौलवी उमर फारुकी यांना नजरकैद करण्यात आले. जम्मू काश्‍मीर लिबरेशन फ्रन्टचे अध्यक्ष यासिम मलिक यांच्यावर कोणताही प्रतिबंध नव्हता त्यांना एक महिन्यानंतर काल अटक करण्यात आली.

निवडणुकीत कोणताही अडथळा आणू नये म्हणून बहुतांश फुटीरतावादी नेत्यांना नजर कैदेत ठेवण्यात आले आहे किंवा त्यांना अटक करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या मेपासून गिलानी यांनाही नजरकैदेत ठेवण्यात आले असून त्यांना शुक्रवारच्या प्रार्थनेसाठीही जाऊ देण्यात येत नाही, अशी माहिती प्रवक्ते अमलगम अय्याज अझगर यांनी सांगितले. अमलगम यांच्यासह महंमद अशरफ सेहरयी, शब्बीर अहमद शाह, नयीम अहमद खान, पीर सैफुल्लाह आदी नेत्यांची मुक्तता करण्यात आल्याचे या प्रवक्‍त्याने सांगितले.

हैदरपोरा भागातील गिलानी यांच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल आणि राज्य पोलिसांची फौज तैनात करण्यात आली आहे. त्यांना अनेकदा बंदी झुगारल्याने अटक करण्यात आली आहे. मात्र त्यानंतर त्यांना प्रत्येकवेळी सोडून देण्यात आले आहे. दरम्यान, हुरियत कॉन्फरन्सचे अध्यक्ष मिरवाइझ यांनाही नजरकैद केल्याची माहिती या प्रवक्‍त्याने दिली. गेल्या महिन्यापासून नजरकैदेत असलेल्या मिरवाइझ यांच्या घराबाहेरही मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल आणि राज्य पोलिसांना तैनात करण्यात आले आहे.
श्रीनगर आणि अनंतनाग येथील लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्काराचे आवाहन केल्यानंतर या फुटीरतावादी नेत्यांच्या नजरकैदेत वाढ करण्यात आली आहे. श्रीनगर येथे 9 एप्रिलला निवडणूक झाली त्या वेळी सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत आठ जण ठार, तर 20 जखमी झाले होते. त्याचप्रमाणे दगडफेकीच्या घटनेत निमलष्करी दलाचे 150 जवान जखमी झाले.

Web Title: gilani, mirwaiz in house arrest