गोव्यात भाजपचे पाच आमदार काँग्रेसच्या संपर्कात 

Congress
Congress

पणजी : विधानसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. विरोधी पक्ष कॉंग्रेसच्या संपर्कात किमान पाच आमदार असून ते विधानसभा पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार जिंकले, तर सरकार स्थापनेच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे. या माहितीस कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दुजोरा दिला आहे. 

शिरोड्याचे माजी आमदार सुभाष शिरोडकर यांनी गोवा आर्थिक विकास महामंडळाचा राजीनामा दिल्यानंतर तो का दिला असावा, याचे विश्‍लेषण राजकीय पातळीवर केले गेले. त्यातच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने दोन्ही पोटनिवडणुका भाजप उमेदवाराच्या विरोधात लढण्याचे जाहीर केले आहे. गोवा सुरक्षा मंचही भाजपविरोधात लढणार आहे. त्यामुळे या मतविभागणीचा फायदा कॉंग्रेसला होईल, असे या काही आमदारांना वाटते. 

त्यांनी मागेही कॉंग्रेसच्या नेत्यांशी संपर्क साधला होता. राजकीय गणित जुळवून सरकार स्थापनेचा दावा केला जाणार होता, पण त्याची चाहूल भाजपला लागली आणि त्यांनी सुभाष शिरोडकर व दयानंद सोपटे यांना भाजपमध्ये प्रवेश दिला. यामुळे कॉंग्रेसची विधानसभेतील ताकद दोन आमदारांनी कमी झाली आणि विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष या नात्याने करण्यात येणारा दावाही फोल ठरण्याची परिस्थिती तयार झाली. यानंतर ही राजकीय घडामोड थोडी मंदावली होती, ती आता पुन्हा सुरु झाली आहे. 

शिरोडकर यांच्या ईडीसीच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर या हालचालींनी गती घेतली आहे. गेल्या 48 तासात चोडणकर यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. पोटनिवडणुकीत कॉंग्रेसला दोन जागा मिळाल्या तर सरकार स्थापनेवेळी कॉंग्रेसला साथ देण्याचा शब्द या आमदारांकडून मिळाल्याचे कॉंग्रेसच्या एका नेत्याने सांगितले. 

होय, सरकार स्थापन करणार 
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, कॉंग्रेसच्या संपर्कात काही आमदार आहेत, ही माहिती मी अमान्य करू शकत नाही. मात्र ते आमदार कोण हेही सांगू शकत नाही. आमचा सरकार स्थापनेचा पूर्वीपासूनच प्रयत्न आहे. पोटनिवडणुकीनंतर आमची विधानसभेतील ताकद दोनने वाढणार आहे. तेव्हा या आमदारांच्या पाठिंब्याने आमचे सरकार येऊ शकेल. ते मागेच येणार होते, मात्र दोन आमदारांनी राजीनामा दिल्याने आमच्या राजकीय डावाला ठेच लागली होती. 

ती महत्त्वाची भेट 
भाजपमधील अंतर्गत धुसफूस अद्याप थांबलेली नाही. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या संपर्कात भाजपचेही काही नेते असल्याची माहिती मिळाली आहे. येत्या दोन दिवसात एका ज्येष्ठ नेत्याची चोडणकर भेट घेणार आहेत. पोट निवडणुकीसंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय यानंतर कॉंग्रेसकडून घेतले जाऊ शकतात असे समजते. ही भेट विशेषतः मांद्रेतील एकगठ्ठा मते कॉंग्रेसकडे वळवण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. 

शिरोडकरांना कॉंग्रेसमधून विरोध 
शिरोड्याचे माजी आमदार सुभाष शिरोडकर हे कॉंग्रेसमध्ये पुन्हा परतू शकतील असे गृहीत धरून त्यांना स्थानिक पातळीवरील कॉंग्रेस नेत्यांनी विरोध करणे सुरु केले आहे. प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांची भेट घेऊन शिरोडकर यांना कॉंग्रेसमध्ये प्रवेश देऊ नका अशी विनंती या नेत्यांनी केली आहे. शिरोडा पंचायतीच्या 11 पंचापैकी 4 अल्पसंख्याक आहेत. त्यामुळे तेथे सत्ताबदलासोबत बदल होईल असे मानले जाते. पंचवाडी पंचायतीवर गोवा फॉरवर्डचे वर्चस्व आहे. बोरी आणि बेतोडा निरंकाल पंचायतीवर कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे मतदारसंघात कॉंग्रेसच्या उमेदवाराला टक्कर देणे सोपे राहिलेले नाही. 

मगोचा विषय दिल्लीत 
शिरोडा आणि मांद्रे मतदारसंघात उमेदवारी जाहीर करण्याचे मागे ठेऊन कॉंग्रेसने चाणाक्षपणा दाखवला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने मांद्रे व शिरोड्यातून लढण्याची केलेली घोषणा गांभीर्याने घेत हा विषय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यापर्यंत पोचवण्याचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी ठरवले आहे. यामुळे मगोला समजावणे हे स्थानिक नेत्यांच्या आवाक्‍याबाहेर गेल्याचे दिसून येते. येत्या दोन दिवसात हा विषय राष्ट्रीय अध्यक्षांसमोर मांडण्यात येणार आहे. येत्या रविवारी राज्य सरकारचे "शिल्पकार' केंद्रीयमंत्री नितीन गडकरी गोव्यात येणार असल्याने त्यांना हा प्रश्‍न सोडवण्यास सांगावे 
असा प्रयत्न यामागे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com