गोवा क्रिकेट असोसिएशनने गौतम सोबतचा करार का रद्द केला?

किशोर पेटकर
Thursday, 7 November 2019

पणजी -  कर्नाटक प्रीमियर लीग (केपीएल) क्रिकेट स्पर्धेतील स्पॉट फिक्सिंगप्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर गोवा क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) सी. एम. गौतम याच्याशी केलेला व्यावसायिक क्रिकेटपटूचा करार तातडीने रद्द केला, तसेच कर्नाटकचाच व्हिडिओ अॅनालिस्ट हरीशंकर यालाही जबाबदारीतून मुक्त केले आहे, असे जीसीएचे सचिव विपुल फडके यांनी गुरुवारी सांगितले.

पणजी -  कर्नाटक प्रीमियर लीग (केपीएल) क्रिकेट स्पर्धेतील स्पॉट फिक्सिंगप्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर गोवा क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) सी. एम. गौतम याच्याशी केलेला व्यावसायिक क्रिकेटपटूचा करार तातडीने रद्द केला, तसेच कर्नाटकचाच व्हिडिओ अॅनालिस्ट हरीशंकर यालाही जबाबदारीतून मुक्त केले आहे, असे जीसीएचे सचिव विपुल फडके यांनी गुरुवारी सांगितले.

यंदाच्या कर्नाटक प्रीमियर लीग स्पर्धेत बेळ्ळारी टस्कर्स व हुबळी टायगर्स यांच्यातील अंतिम लढतीत गौतम व कर्नाटकचा आणखी एक खेळाडू अब्रार काझी यांच्यावर स्पॉट फिक्सिंगचा आरोप आहे. त्या पार्श्वभूमीवर बंगळूरच्या सीबीआय अधिकाऱ्यांनी या दोन्ही क्रिकेटपटूंना अटक केली आहे. गौतम हा बेळ्ळारी संघाचा कर्णधार होता, तर अब्रार खेळाडू होता. यंदाच्या देशांतर्गत मोसमात गौतमने गोव्याशी, तर अब्रारने मिझोरामशी करार केला आहे. अंतिम लढतीत संथ फलंदाजी करण्यासाठी गौतम व अब्रार यांनी स्पॉट फिक्सर्सकडून 20 लाख रुपये स्वीकारल्याचा आरोप आहे. अंतिम लढतीत हुबळी संघाने गौतमच्या बेळ्ळारी संघाला आठ धावांनी हरविले होते. गौतम व अब्रार यांच्यावर बंगळूर ब्लास्टर्स संघाविरुद्धच्या लढतीतही स्पॉट फिक्सिंग केल्याचा आरोप आहे.

जीसीएचे सचिव विपुल यांनी सांगितले, की गौतम याच्या अटकेचे वृत्त कळताच आम्ही तातडीने कारवाई केली आहे, तसेच स्पॉट फिक्सिंगप्रकरणी संशय असलेला संघाचा व्हिडिओ अॅनालिस्ट हरीशंकर याचा करारही आम्ही रद्द केला असून संबंधित कारवाईची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळास दिली आहे. यापुढे गौतमचा गोवा क्रिकेटशी संबंध नसेल.

गोवा क्रिकेट असोसिएशनने सय्यद मुश्ताक अली टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी गौतमची कर्णधारपदी नियुक्ती केली होती. करार रद्द केल्यामुळे गौतमच्या जागी अनुभवी अष्टपैलू दर्शन मिसाळ गोव्याचे नेतृत्व करेल आणि प्रथमेश गावस बदली खेळाडू असेल, असे विपुल यांनी स्पष्ट केले. यंदाच्या मोसमासाठी जीसीएने गौतमसह कर्नाटकचा अमित वर्मा व दिल्लीचा आदित्य कौशिक यांना व्यावसायिक क्रिकेटपटू या नात्याने करारबद्ध केले होते. अमित सलग दुसऱ्या मोसमात गोव्याकडून खेळत आहे.

सय्यद मुश्ताक अली टी-20 क्रिकेट स्पर्धेत गोव्याचा पहिला सामना विशाखापट्टणम येथे शुक्रवारी (ता. 8) बडोद्याविरुद्ध होणार आहे. गतमहिन्यात झालेल्या विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत गौतम गोव्याकडून 7 सामने खेळला होता. त्याने 22.28 च्या सरासरीने 156 धावा केल्या होत्या. अमित वर्माच्या जागी त्याने सौराष्ट्रविरुद्धच्या लढतीत गोव्याचे नेतृत्व केले होते. त्यानंतर आता जीसीएने टी-20 स्पर्धेसाठी गौतमकडे नेतृत्व सोपविले होते.

कर्नाटकने गतमोसमात डावलल्यानंतर गौतमने यंदा गोव्याशी पाहुण (व्यावसायिक) क्रिकेटपटू या नात्याने करार केला होता. गौतम यष्टिरक्षक असून तो 33 वर्षांचा आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Goa Cricket Association canceled contract with Gautam