'गोव्याबाबत पवार म्हणतात ते बरोबर पण...', तृणमूलचा काँग्रेसवर निशाणा | Goa Election 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mahua Moitra On Booster Dose

पवार म्हणतात ते बरोबर आहे. भाजप विरोधात एकत्र यायला तयार असणाऱ्यांना सोबत घ्यायला आम्हाला काहीच अडचण नाही असंही तृणमूल नेत्या महुआ मोइत्रा म्हणाल्या.

'गोव्याबाबत पवार म्हणतात ते बरोबर पण...', तृणमूलचा काँग्रेसवर निशाणा

पणजी - तृणमूल काँग्रेस पक्षाच्या (TMC) अध्यक्षा ममता बॅनर्जी (Mamata Banarjee) यांनी गोवा विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा गेल्या महिन्यात केली. आता निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्यानंतर येथील भाजप (BJP) सरकार हेच ‘तृणमूल’चे लक्ष्‍य असल्याचे सूतोवाच पक्षाच्या प्रभारी खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांनी ‘सकाळ’शी बोलताना केले. ममता बॅनर्जी यांनी गोव्याच्या रिंगणात येऊन भाजप सरकार व काँग्रेसलाही आव्हान दिल्याचे मानले जात आहे. पण येथे भाजप नको, असा मतप्रवाह असणाऱ्या जनतेला पर्याय देणे हेच तृणमूल काँग्रेसचे ‘गोवा मिशन’ आहे, असे स्पष्ट करीत भाजपला आम्ही हरवू शकतो, हे ममता बॅनर्जी यांनी सिद्ध केले आहे, याकडे मोईत्रा यांनी लक्ष वेधले.

‘तृणमूल’ पश्‍चिम बंगालबाहेर पंख पसरवू लागला आहे. अन्य राज्यांत नशीब अजमाविण्याचे धोरण म्हणजे पंतप्रधानपदाच्या खुर्चीत ममता बॅनर्जी यांना पाहण्याचे पक्षाचे स्वप्न असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर बोलताना गुजरातचे मुख्यमंत्री मोदी पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकतात, तर ममता बॅनर्जी का होऊ शकत नाहीत, असा सवाल मोईत्रा यांनी केला. ममतांना काही सिद्ध करायची गरज नाही. आम्ही मत फोडायला नाही, पर्याय द्यायला गोव्यात आलो आहोत, असेही त्या म्हणाल्या.

बॅनर्जी या महाराष्ट्राच्या भेटीवर आल्या असताना काँग्रेस वगळून आघाडीचा पर्याय त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत दिला होता. याविषयी विचारले असता मोईत्रा म्हणाल्या, ‘‘काँग्रेस भाजपला हरवू शकत नसेल तर काय उपयोग? ते ज्या जागा जिंकतात त्या सोडून उरलेल्या जागांवर पर्याय उभा करायला नको का? ज्या ठिकाणी प्रादेशिक पक्षांची ताकद आहे तिथल्या जागा महत्त्वाच्या आहेत. काँग्रेस आमचा विरोधक नाही. आमचा विरोधक भाजप आहे.’’

काँग्रेसला चिमटे
‘‘भाजप विरोधक एकत्र येऊन महाविकास आघाडीसारखा प्रयोग करणे शक्य आहे. पवार म्हणतात ते बरोबर आहे. भाजप विरोधात एकत्र यायला तयार असणाऱ्यांना सोबत घ्यायला आम्हाला काहीच अडचण नाही. पण तो राष्ट्रीय पक्ष (काँग्रेस) त्यांचा ‘इगो’ सोडून येऊ शकतो का हा प्रश्न आहे. २००४ -२००९ मधील संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) आता राहिलेली नाही. २०१४ नंतर ‘यूपीए’ कुठे आहे? आताचा देश वेगळा आहे. त्यासाठी या आघाडीच्या निर्माणाची गरज आहे,’’ अशी भूमिका मोईत्रा यांनी मांडली. ‘आम्ही राजे म्हणूनच जन्माला आलो आहोत. बाकीच्यांनी आमच्यासाठी यावे, असे कोणाला वाटत असेल तर त्याला कोण काय करणार? आता जो ताकदवान त्याला पाठिंबा मिळेल,’ असा टोला त्यांनी राहुल गांधी यांचा थेट उल्लेख न करता मारला.

हेही वाचा: PM मोदींच्या सुरक्षेत त्रुटी : 'पोलिसांना रोखणारा काँग्रेस नेता कोण?'

मेघालयकडेही लक्ष
‘‘मोदींना हरवू शकत नाही ही परिस्थिती आता नाही. ते दोन राज्यांत हरले आहेत, ही सुरुवात आहे. आता पंजाब, उत्तर प्रदेश ही राज्ये महत्त्वाची आहेत. आम्ही मेघालयमध्येही निवडणूक लढविणार आहोत,’’ असे मोईत्रा यांनी सांगितले.


‘बोला, ऐका आणि वाहवा करा’
‘‘द्वेष हाच भाजपचा धर्म आहे. हरिद्वारमध्ये काय झाले? योगी आदित्यनाथ यांच्या ‘८०-२०’सारख्‍या वक्तव्यावर कारवाई होत नाही. या देशात अशी वक्तव्ये कोणी कसे करू शकते? त्यावर कारवाई कशी होत नाही? भाजपने फक्त बोलणारे नाही, तर ते ऐकणारे आणि त्याची वाहवा करणारे पण तयार केले आहेत, अशी टीका तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी केली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top