भाजप गोव्यात विस्तार मोहिम राबविणार

अवित बगळे
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

गोव्यातील विधानसभेच्या 40 मतदारसंघात ही मोहिम राबविली जाणार आहे. या मोहिमेत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासह भाजपचे मंत्री, आमदार, प्रदेश पातळीवरील नेते कार्यकर्ते म्हणून सहभागी होणार आहेत.

पणजी (गोवा) : गोव्यात भाजपचे गोवा फॉरवर्ड, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि तीन अपक्षांसोबत आघाडी सरकार असले तरी भाजपने आपल्या संघटनवाढीवरील लक्ष अजिबात कमी केलेले नाही. येत्या 26 सप्टेंबरपासून महिनाभर भाजप गोव्यात विस्तार मोहिम राबविणार आहे. 14 लाख लोकसंख्येच्या गोव्यात भाजपचे 4 लाख 30 हजार सदस्य आहेत. त्यात या मोहिमेदरम्यान वाढ केली जाणार आहे.

पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाने मतदान केंद्रनिहाय पक्ष विस्तावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी राज्यभरातील 1 हजार 642 मतदान केंद्रांच्या परीसरात जनसंपर्कासाठी 375 कार्यकर्त्यांना प्रशिक्षित केले आहे. यापैकी एका कार्यकर्त्याला प्रत्येक मतदारसंघातील एक या प्रमाणे सहा मतदान केंद्रांवर काम करावे लागेल. एका मतदान केंद्रावर दोन दिवस हा प्रशिक्षित कार्यकर्ता राहणार आहे. पहिल्या दिवशी दुपारी 4 ते रात्री 9 मतदार संपर्क साधेल. रात्री तेथेच एका कार्यकर्त्यांच्या घरी भोजन करून तो कार्यकर्ता तेथेच मुक्काम करणार आहे. दुसऱ्या दिवशी कार्यकर्त्यांचे म्हणणे जाणून घेणार आहे.

गोव्यातील विधानसभेच्या 40 मतदारसंघात ही मोहिम राबविली जाणार आहे. या मोहिमेत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासह भाजपचे मंत्री, आमदार, प्रदेश पातळीवरील नेते कार्यकर्ते म्हणून सहभागी होणार आहेत. महिनाभर ही मोहिम सुरु राहील, अशी माहिती तानावडे यांनी दिली. 

Web Title: Goa news BJP expansion in Goa