नौदलच्या महिला अधिकाऱ्यांचा चमू आजपासून जगभ्रमंतीवर

विलास महाडिक
रविवार, 10 सप्टेंबर 2017

भारतात पूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांसह सुरु होणारा हा प्रवास पहिल्यांदाच होत आहे. ही आयएनएसव्ही तारिणी ही आयएनएसव्ही म्हादईची पुढील आवृत्ती आहे. भारत सरकारचा ‘नारी शक्ती’ला असलेला भक्कम पाठींबा लक्षात घेता हा प्रकल्प सागरी नौकानयन उपक्रमांच्या प्रचारासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. 

पणजी - नाविका सागर परिक्रमा’ या उपक्रमांतर्गत नौदलच्या महिला अधिकाऱ्यांचा चमू भारतीय बनावटीच्या आयएनएसव्ही ‘तारिणी’ या नौकेने आज जगप्रवासाला रवाना झाला.

भारतात पूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांसह सुरु होणारा हा प्रवास पहिल्यांदाच होत आहे. ही आयएनएसव्ही तारिणी ही आयएनएसव्ही म्हादईची पुढील आवृत्ती आहे. भारत सरकारचा ‘नारी शक्ती’ला असलेला भक्कम पाठींबा लक्षात घेता हा प्रकल्प सागरी नौकानयन उपक्रमांच्या प्रचारासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. 

भारत देशासाठी हा गौरवास्पद व ऐतिहासिक क्षण असल्याचे मत संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्‍त केले. पहिला भारतीय वैयक्तिक जागतिक जलप्रवास 19 ऑगस्ट 2009 ते 19 मे 2010 या काळात आयएनएसव्ही म्हादईसोबत निवृत्त कॅप्टन दिलीप दोंदे यांनी केला होता. तसेच पहिला भारतीय विनाथांबा वैयक्तिक जगप्रवास कमांडर अभिलाष टॉमी यांनी 1 नोव्हेंबर 2012 ते 31 मार्च 2013 या कालावधीत केला होता.

आयएनएसव्ही तारिणीवरील या चमूमध्ये लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी,लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल,लेफ्टनंट कमांडर स्वाती पी,लेफ्टनंट ऐश्वर्या बोद्दापती, लेफ्टनंट विजया देवी , लेफ्टनंट पायल गुप्ता यांचा समावेश आहे.

या जलप्रवासाकरिता सर्व महिला कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देण्यात आले आहे. 
रसद व गरजेनुसार नौका दुरुस्तीसाठी चार बंदरांवर ही नौका विसावा घेणार आहे. या मोहिमेला ‘नाविका सागर परिक्रमा’ हे  नाव देण्यामागे देशातील महिला सशक्तीकरणाला मजबूती देणे आणि भारतीय नौसेनेतर्फे सागरी नौकानयनाचा प्रसार करणे हा आहे.

Web Title: Goa news women sailor group in sea