आता लक्ष्य बेहिशेबी मालमत्ता

modi
modi

पणजी/बेळगाव - काळा पैसा बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकार जोरदार प्रयत्न करत असून यापुढे बेहिशेबी मालमत्ता असणाऱ्यांविरोधात कठोर पाऊले उचलली जातील, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिला. ‘जनतेच्या स्वप्नातील भारत देण्यासाठी मला फक्त ३० डिसेंबरपर्यंत वेळ द्या. त्यानंतर माझ्याकडून अपेक्षित काम झाले नाहीत, तर मला हवी ती शिक्षा द्या, मी ती भोगायला तयार आहे. मी तुम्हाला स्वप्नातील भारत निर्माण करून दाखवेन,’ असे भावनिक आवाहनही करत मोदी यांनी जनतेला काळ्या पैशाविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत सरकारला सहकार्य करण्याची विनंती केली. 

पंतप्रधानांनी आज गोव्यातील मोपा विमानतळ प्रकल्प व तुये येथील इलेक्‍ट्रॉनिक्‍स सीटी प्रकल्पाची पायाभरणी केली. गोवा शिपयार्डच्या तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण, तसेच तटरक्षक दलाच्या गस्ती नौका बांधणी प्रकल्पाची सुरवातही पंतप्रधानांनी केली. या कार्यक्रमानंतर त्यांनी बेळगावमध्येही एका कार्यक्रमात नागरिकांना आवाहन केले. बेनामी संपत्ती बाळगणाऱ्यांविरोधात लवकरच अनेक कठोर उपाय योजले जातील, यासाठी मला केवळ पन्नास दिवस द्या, असे त्यांनी आज सांगितले. मोदी यांनी काँग्रेसवरही या वेळी टीका केली. ‘ज्या लोकांनी कोट्यवधींचे गैरव्यवहार केले, ते आता चार हजार रुपयांचे सुटे घेण्यासाठी रांगेत उभे आहेत. देशाची सत्तर वर्षे लूट करणारेच नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचा विरोध करत आहेत. काळ्या पैशाविरोधातील कारवाई अधिक तीव्र करत ७० वर्षांचा हा रोग पुढील सतरा महिन्यांत दूर करायचा आहे. काँग्रेसने २५ पैशाचे नाणे बंद केले. त्यांची तेवढीच क्षमता होती. आम्ही मात्र मोठ्या मूल्याच्या नोटा बंद करण्याची हिंमत दाखविली आहे,’ असेही मोदी म्हणाले. 

दहा महिन्यांपासूनचे नियोजन

पाचशे आणि हजाराच्या नोटा बंद करण्यासाठी दहा महिन्यांपूर्वीच नियोजन करण्यास सुरवात केल्याचा गौप्यस्फोट मोदींनी आज केला. यासाठी एक छोटे पण कार्यक्षम पथक नेमून नव्या नोटा छापणे आणि इतर पावले उचलल्याचे मोदींनी सांगितले. भारताला ‘कॅशलेस’ व्यवहाराच्या दिशेने न्यायचे असून, आपण डेबिट आणि क्रेडिट कार्ड या प्लॅस्टिक मनीबाबत गंभीरपणे विचार करायला हवा, असे आवाहनही मोदींनी केले. 

नोटा रद्द करण्याच्या निर्णयामुळे आर्थिक आणीबाणी निर्माण झाली आहे. मोदींनी नागरिकांना भावनिक आवाहन करून फसविणे थांबवावे आणि जनतेच्या फायद्याचेच निर्णय घ्यावेत.

- मायावती, बसप अध्यक्षा

पंतप्रधान मोदींनी भावनिक होण्याची गरज नाही. त्यांनी केवळ वास्तववादी विचार करावा आणि भ्रष्टाचारी लोकांविरुद्धच्या कारवाईत सामान्य प्रामाणिक जनतेला का त्रास होत आहे, ते सांगावे.

- डी. राजा, भाकप नेते

पंतप्रधान मोदी झाले भावुक

पणजी येथे भाषण करताना मोदी काहीसे भावुक झाल्याने व्यासपीठावरील नेत्यांनाही धक्का बसला. ‘मी देशासाठी माझे घर आणि कुटुंब सोडले आहे. केवळ खुर्चीवर बसून राहण्यासाठी माझा जन्म नाही,’ असे सांगताना मोदींचा आवाज कातर झाला होता. ज्यांना केवळ राजकारण करायचे आहे, त्यांनी खुशाल करावे. मात्र, केंद्र सरकारला हुकूमशाही राबवायची म्हणून निर्णय घेतले नसून, गरिबी म्हणजे काय, याची जाणीव असल्याने अशा लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी कठोर निर्णय घेतले जातात, असेही मोदींनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com