मद्यपींसाठी खुशखबर! २४ तास सुरु राहणार बार आणि रेस्टॉरंट

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 10 October 2020

देशात अनलॉक-५ ची प्रक्रिया सुरु झाली आहे. केंद्र सरकारने कंटेंमेंट झोनच्या बाहेरील सर्व उद्योग सुरु करण्याची परवानगी दिली आहे.

नवी दिल्ली- देशात कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. देशात अनलॉक-५ ची प्रक्रिया सुरु झाली आहे. केंद्र सरकारने कंटेंमेंट झोनच्या बाहेरील सर्व उद्योग सुरु करण्याची परवानगी दिली आहे. अनेक ठिकाणी हॉटेल आणि बार ५० टक्के क्षमतेने सुरु करण्याची मंजुरी देण्यात आली आहे. असे असले तरी मास्क वापरणे आणि शारीरिक अंतराचे पालन करण्याचे सर्वांना बंधनकारक असणार आहे. 

दिल्ली सरकारने अनलॉक-५ मध्ये मोठ्या प्रमाणात निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. केजरीवाल सरकारने बार आणि रेस्टॉरंट सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे बार आणि रेस्टॉरंट २४/७ म्हणजे २४ तास सुरु ठेवण्यात येत आहेत. मात्र, तरीही लोकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. याआधी लोक ज्याठिकाणी गर्दी करायचे, तेथे सध्या रिकाम्या जागा दिसून येत आहेत.

भारत होतोय शस्त्रसज्ज! चिनी ड्रोनचा सामना करणार रुस्तम-२ आणि इस्त्राईली हेरॉन 

रेस्टॉरंट आणि बारचे दिल्लीकरांच्या जीवनात महत्वाचे स्थान राहिले आहे. मात्र, कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे सरकारला सर्वकाही बंद ठेवावे लागले. व्यवसाय तोट्यात जात असल्याने अनेक रेस्टॉरंट आणि बार मालकांनी कामगारांना काढून टाकलं. अनेक रेस्टॉरंट आणि बार बंद होण्याच्या मार्गावर आले. आता हळूहळू सर्व सुरु केले जात आहे. पण कोरोनाच्या भितीने लोक अजूनही येथे येण्यास टाळत आहेत. 

दिल्लीमध्ये सध्या २१६७८ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. आतापर्यंत ५७३१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. समाधानाची गोष्ट म्हणजे दिल्लीचा रिकव्हरी रेट ९० टक्क्यांच्या पुढे गेला आहे. तसेच डेथ रेटही नियंत्रणात आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी जाहीर केलं की, सर्व मार्केट रोजच्या खरेदीसाठी सुरु असतील. यापूर्वी एका झोनमधील केवळ दोन मार्केट सुरु करण्याची परवानगी देण्यात आली होती. याशिवाय सिनेमागृहे १५ ऑक्टोंबरपासून सुरु करण्याचे संकेतही केजरीवाल यांनी दिले आहेत.

(edited by- kartik pujari)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news for alcoholics Bars and restaurants will now be open 24 hours a day