खूशखबर ! केंद्र भरणार चार लाख रिक्त जागा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

- जितेंद्र सिंह यांची माहिती
- याच आर्थिक वर्षात करणार प्रक्रिया पूर्ण

नवी दिल्ली ः केंद्र सरकारच्या विविध विभागांतील चार लाख रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, येत्या आर्थिक वर्षातच ती पूर्ण करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे, असे पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी आज राज्यसभेत सांगितले. 

के. सी. राममूर्ती, आनंद शर्मा यांच्या प्रश्नांच्या उत्तरात जितेंद्र सिंह यांनी केंद्र सरकारच्या अखत्यारीतील रिक्त जागांची संख्या सात लाखांच्या घरात गेल्याचे मान्य केले. ते म्हणाले, की सध्या सहा लाख 83 हजार 23 रिक्त जागा आहेत. मात्र, त्यातील अनेक जागा भरण्याची प्रक्रिया रेल्वे आणि "यूपीएससी'ने सुरू केली आहे.

राममूर्ती यांनी चार लाख रिक्त जागा असल्याचे सांगितल्यावर जितेंद्र सिंह यांनी ही भरतीप्रक्रिया याच आर्थिक वर्षात सुरू केली जाईल, असे सांगितले. ते म्हणाले, की गेल्या पाच वर्षांत केंद्र सरकारी रिक्त पदांच्या भरतीचे प्रमाण वाढले आहे. 2013-14 मध्ये केंद्रीय रिक्त पदांचे प्रमाण 16.2 टक्के होते ते आता 11.3 टक्‍क्‍यांपर्यंत कमी झाले आहे. वैज्ञानिक संस्थांमध्ये योग्य उमेदवार मिळत नाहीत, हा अनुभव असल्याने अधिकाऱ्यांना मुदतवाढ द्यावी लागते. या रिक्त जागांच्या भरतीत पंतप्रधान कार्यालयाच्या अखत्यारीतील "डीओपीटी' नियंत्रण ठेवत नाही, असेही जितेंद्र सिंह यांनी सांगितले. 

मालेगाव, भिवंडीचा प्रस्ताव नाही 
वस्त्रोद्योग मंत्रालयाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या टेक्‍स्टाइल पार्कसाठी मालेगाव व भिवंडीसारख्या शहरांची निवड करणार का, असे हुसेन दलवाई यांनी विचारले. त्यावर वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनी, मालेगाव किंवा इचलकरंजीत अशी टेक्‍साइल पार्क उभारण्याचा प्रस्ताव केंद्राकडे आलेला नाही, त्यामुळे तेथे ती होणार नाहीत, असे स्पष्ट केले. 

कॉंग्रेसच्या यंदाच्या निवडणूक जाहीरमान्यात हेच आश्वासन दिलेले होते; पण त्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केली. - जितेंद्र सिंह, पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news center Government fill Four lakh vacancies