व्हिसाबाबतच्या अटी सरकारकडून शिथिल; पर्यटन, वैद्यकीय तपासणीवर बंदी तूर्त कायम

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 23 October 2020

सरकारने व्हिसा अटी शिथिल करून अनिवासी भारतीय, भारतीय वंशाचे परदेशी नागरिक आणि परदेशी प्रवाशांना भारतात येण्यास परवानगी दिली आहे. अर्थात, पर्यटन आणि वैद्यकीय तपासणीसाठी व्हिसावरील बंदी तूर्तास कायम ठेवली आहे. 

नवी दिल्ली - कोरोना संकटामुळे लागू लॉकडाउनमधील आंतरराष्ट्रीय प्रवासबंदी संपविण्यासाठी सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या अंतर्गत आज सरकारने व्हिसा अटी शिथिल करून अनिवासी भारतीय, भारतीय वंशाचे परदेशी नागरिक आणि परदेशी प्रवाशांना भारतात येण्यास परवानगी दिली आहे. अर्थात, पर्यटन आणि वैद्यकीय तपासणीसाठी व्हिसावरील बंदी तूर्तास कायम ठेवली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना संकटामुळे सरकारने मार्चपासून आंतरराष्ट्रीय प्रवासावर बंदी घातली होती. ही बंदी अंशतः मागे घेताना केंद्रीय गृह खात्याने आज व्हिसा अटी शिथिल करण्याचे आदेश जारी केले. यानुसार सर्व अनिवासी भारतीय (ओआयसी), भारतीय वंशाचे नागरिक (पीआयओ) तसेच इतर परदेशी नागरिकांना हवाई आणि जलमार्गाद्वारे अधिकृत विमानतळे किंवा सीपोर्ट इमिग्रेशन चेकपोस्ट माध्यमातून भारतात प्रवेशाची मुभा असेल. इलेक्ट्रॉनिक, पर्यटन आणि वैद्यकीय उपचार या तीन श्रेणी वगळता उर्वरित सर्व श्रेणींमधील प्रवाशांना तत्काळ व्हिसा मिळेल. वैद्यकीय उपचारासाठी भारतात येऊ इच्छिणाऱ्यांना वैद्यकीय सहाय्यकासोबत मेडिकल व्हिसासाठी अर्ज करता येईल. व्हिसाची मुदत संपली असेल तर या श्रेणीतील प्रवाशांना भारतीय वकिलातींमार्फत, टपालाद्वारे व्हिसा मिळवता येईल. त्याचप्रमाणे कोरोना संक्रमणाची भीती पाहता या सर्व प्रवाशांना आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल, असेही गृह खात्याने स्पष्ट केले आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: government has started moving to end the international travel ban in Lockdown