esakal | नक्षलवादाविरोधात मोहिम अधिक तीव्र करणार : अमित शहा
sakal

बोलून बातमी शोधा

नक्षलवादाविरोधात मोहिम अधिक तीव्र करणार : अमित शहा

गृहमंत्री शहा यांनी आज छत्तीसगडमध्ये येत उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीला मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह राज्य पोलिस दल आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नक्षलवादाविरोधात मोहिम अधिक तीव्र करणार : अमित शहा

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

जगदलपूर (छत्तीसगड) : नक्षलवादाची समस्या मिटवून टाकण्यासाठी लढाई अधिक तीव्र केली जाईल, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज दिला. छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात २२ जवान हुतात्मा झाल्यानंतर शहा यांनी आज परिस्थितीचा आढावा घेतला.

हेही वाचा : २०३६ पर्यंत पुतीन सत्ते राहणार, सविंधानात केला बदल

गृहमंत्री शहा यांनी आज छत्तीसगडमध्ये येत उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीला मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह राज्य पोलिस दल आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना अमित शहा म्हणाले की, हुतात्मा जवानांच्या त्यागामुळे नक्षलवादविरोधी लढाईला ‘निर्णायक वळण’ मिळाले असल्याने हा त्याग कधीही विसरला जाणार नाही. मी देशवासीयांना ग्वाही देतो की, नक्षलवादविरोधी कारवाई थांबणार नाही, ती आता अखेरपर्यंत अधिक तीव्र केली जाणार आहे. या लढाईत विजय निश्‍चित आहे.

शहा यांनी भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातर्फे हुतात्मा जवानांना श्रद्धांजली वाहिली. गेल्या काही वर्षांत नक्षलवादविरोधी मोहिमेला वेग आला असून नुकत्याच झालेल्या घटनेमुळे मोहिमेचा वेग आणखी वाढणार आहे, असेही ते म्हणाले. या लढाईत केंद्र आणि राज्य एकत्रित लढत असून सर्व स्थानिकांच्या सल्ल्यानुसारच मोहिम राबविली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बस्तर भागात सुकमा आणि विजापूर जिल्ह्याला लागून असलेल्या जंगलामध्ये नक्षलवादविरोधी मोहिमेवेळी नक्षलवाद्यांनी शनिवारी (ता. ३) जवानांच्या एका पथकावर हल्ला केला. यावेळी झालेल्या चकमकीत २२ जवान हुतात्मा झाले. यामध्ये सीआरपीएफचे आठ (पैकी कोब्रा दलाचे ७), जिल्हा राखीव दलाचे आठ आणि विशेष कृती दलाच्या सहा जवानांचा समावेश आहे. एक जवान अद्यापही बेपत्ता आहे. त्याचे अपहरण केल्याचा दावा नक्षलवाद्यांनी केला असून त्याबाबत सीआरपीएफकडून शहानिशा करण्यात येत आहे.

VIDEO: योगी आदित्यनाथांनी पत्रकाराला शिवी दिली? व्हायरल व्हिडीओमागे काय आहे सत्य?​

मोहिमेमध्ये त्रुटी : राहुल गांधी
नक्षलवाद्यांविरोधात आखलेल्या मोहिमेची आखणी अत्यंत ढिसाळ आणि निष्काळजीपणे केल्यानेच जवानांवर हल्ला झाला, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. नक्षलवाद्यांबाबत अचूक माहिती मिळाली होती आणि नक्षलवादीही बरेच मारले गेले, असे विधान सीआरपीएफचे महासंचालक कुलदीप सिंह यांनी केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना राहुल यांनी,‘आमचे जवान म्हणजे बळीचा बकरा नव्हे. प्रत्येक भारतीय जवानाला पुरेसे शरीर संरक्षण हवे. माहितीमध्ये काहीही चूक नव्हती तर इतक्या मोठ्या संख्येने जवान कसे मारले गेले? म्हणजेच मोहिम ढिसाळपणे आखली गेली होती,’ अशी टीका ट्वीटरवर केली.

(संपादन : सागर डी. शेलार)

loading image