ऑनलाईन्स गेमिंगच्या जाहिराती आधी वैधानिक इशारा हवाच; केंद्राकडून नव्या गाईडलाईन्स

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 5 December 2020

पैसे जिंकण्यासाठी याप्रकारचे ऑनलाईन गेम्स खेळताना 18 वर्षांखालील मुलांना जाहिरातीत दाखवले जाऊ नये, असं स्पष्टपणे या गाईडलाईन्समध्ये सांगण्यात आलंय.  

नवी दिल्ली : ऑनलाईन गेमिंग अथवा फँटसी स्पोर्ट्स साईट्सची जाहिरात करताना सोबत वैधानिक इशारा (disclaimer) देण्याची सूचना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने टीव्ही चॅनेल्सना स्पष्टपणे दिली आहे. शुक्रवारी काढलेल्या सुचनेनुसार, मंत्रालयाने म्हटलंय की टीव्ही चॅनेल्स गेमिंग साईट्सच्या जाहिराती दाखवतात मात्र त्यासोबतच ते  प्रेक्षकांना हे गेम खेळताना असणाऱ्या आर्थिक जोखिमीची माहिती देत नाहीत. आतापासून असं चालणार नाही. या जाहिरातींमध्ये याबाबतची सुचना दिली जावी, यासाठी मंत्रालयाने नव्या गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत.

ऑनलाईन गेमिंग हे सट्टा आणि इतर गोष्टींशी निगडीत आहेत. अ‍ॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स काउन्सिल ऑफ इंडियाने (एएससीआय) या जाहिराती जारी करण्याबाबतीतली मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत, असे मंत्रालयाने म्हटले आहे. 15 डिसेंबरपासून ही मार्गदर्शक तत्त्वे लागू होणार आहेत. पैसे जिंकण्यासाठी याप्रकारचे ऑनलाईन गेम्स खेळताना 18 वर्षांखालील मुलांना जाहिरातीत दाखवले जाऊ नये, असं स्पष्टपणे या गाईडलाईन्समध्ये सांगण्यात आलंय.  

हेही वाचा - 'भाजपची लाट वगैरे काही नाही; तेलंगणा भाजपला जरुर रोखेल'

छापील जाहिरातींनाही सुचना देण्यात आल्या आहेत. अशा जाहिराती छापताना एक सुचनाही छापण्यात यावी. अशा प्रकारचे ऑनलाईन गेम्स खेळण्यामध्ये आर्थिक जोखिम असू शकते तसेच याचे व्यसनही लागू शकते, अशी स्पष्ट सुचना या जाहिरातीत समाविष्ट असावी. छापील जाहीरातीच्या एकूण जागेपैकी 20 टक्क्याहून कमी जागा या सूचनेसाठी देण्यात येऊ नये, असाही स्पष्ट नियम या गाईडलाईन्समध्ये समाविष्ट आहे. याचप्रकारच्या सुचना या ऑडीओ-व्हीज्यूअल्स तसेच ऑडीओ जाहीरातींना देण्यात आल्या आहेत. गाईडलाईन्सनुसार, सुचना ही जाहिरातीनंतर यावी तसेच ती जाहिरातीच्या भाषेतच दिली जावी. तसेच या सुचनेचा ऑडीओ हा सामान्य आवाजात समजेल असाच असावा. 

हेही वाचा - बाब्बो! दिवसाची मजुरी 198 रुपये आणि 3.5 कोटींची GST भरण्याची नोटीस

या गाईडलाईन्स नुसार, ऑनलाईन गेमिंग हे आर्थिक उत्पन्न कमावण्याचा अथवा रोजागाराला पर्याय या पद्धतीने समोर येता कामा नये. इतरांपेक्षा हे गेम्स खेळणारे लोक अधिक यशस्वी ठरले असल्याचे चित्रण देखील या जाहिरातींमधून दाखवू नये.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government MIB asks for mandatory warning about financial risks message with online gaming ads