बाब्बो! दिवसाची मजुरी 198 रुपये आणि 3.5 कोटींची GST भरण्याची नोटीस

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 5 December 2020

नोटीशीत ठरवून दिलेल्या कालावधीनंतरही जीएसटीचे थकीत पैसे न भरल्याच्या कारणावरुन पोलिसांनी त्याला अटक केली होती.

रांची : झारखंडमध्ये एक चमत्कारीक घटना समोर आलीय. मनरेगा अंतर्गत दररोज 198 रुपयांच्या रोजंदारीवर काम करणाऱ्या एका कामगाराला तब्बल 3.5 कोटी रुपयांची जीएसटी न भरल्याच्या कारणावरुन काही काळासाठी अटक करण्यात आली होती. ही घटना आहे झारखंडमधील जमशेदपूरजवळील घाटशीलामधील. लादुम मुर्मू असं या कामगाराचं नाव आहे. नोटीशीत ठरवून दिलेल्या कालावधीनंतरही जीएसटीचे थकीत पैसे न भरल्याच्या कारणावरुन पोलिसांनी त्याला अटक केली होती. मात्र, त्याची हालाखीची आर्थिक परिस्थिती पाहून तसेच गावकऱ्यांनी केलेल्या निषेधामुळे त्याला पोलिसांनी सोडलं.

हेही वाचा - 'भाजपची लाट वगैरे काही नाही; तेलंगणा भाजपला जरुर रोखेल'

हा घोटाळा कसा काय झाला याबाबतचा अधिक तपास पोलिसांनी केला असता त्यांना आढळले की, या कामगाराचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँकेचे पासबुक ही कागदपत्रे एका स्टील कंपनीकडून त्यांच्या उद्योगातील आर्थिक व्यवहारांकरिता अवैधरित्या वापरली गेल्याची माहिती समोर आली. त्याच्या कागदपत्रांचा गैरवापर करुन मेसर्स एसएस स्टील या नावाने खोटी कंपनी स्थापन करुन व्यवसाय केला गेला आहे. जीएसटी अधिकाऱ्यांनी देखील याबाबत कसलीही प्रत्यक्ष तपासणी न करताच या खोट्या कंपनीला जीएसटीचा नंबर दिला होता. याबाबत अधिक माहिती अशी मिळाली की, अधिकाऱ्यांनी योग्यरितीने तपास न करताच जीएसटी नंबर दिला होता, ज्यामुळे एका कामगाराला अटक झाली.

हेही वाचा - शेतकरी आंदोलनात जोश-उत्साह-प्रोत्साहनासाठी डीजे ट्रॅक्टर

पीडित कामगाराशी याबाबत संवाद साधल्यावर तो म्हणाला की, 2018 मध्ये त्याने आपली काही कागदपत्रे आपल्या एका पुतण्याला दिली होती. सरकार दर महिन्याला त्याच्या बँक खात्यामध्ये 2 हजार रुपये पाठवेल, या आशेवर त्याने ही कागदपत्रे सोपवली होती. लादुमने म्हटलं की, त्याला दर महिन्याला दोन हजार तर मिळाले नाहीतच मात्र ही 3.5 कोटी रुपयांच्या जीएसटी भरण्याबाबतची नोटीस मात्र मिळाली. नंतर त्याच्यावर केस दाखल झाली ज्यामुळे त्याला अटक करण्यात आली. या कामगाची पत्नी काही दिवसांपूर्वीच वारली होती. सध्या तो त्याच्या दोन मुलांसह राहतो. पोलिसांनी सांगितलं की लवकरच खऱ्या गुन्हेगारांना पकडलं जाईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ladum Murmu arrested for not paying Rs 3.5 crore as GST Jharkhand MGNREGA labourer