esakal | स्वत:ची SUV कार विकून गरजूंना ऑक्सिजन पुरवणारा मुंबईकर चर्चेत

बोलून बातमी शोधा

स्वत:ची SUV कार विकून गरजूंना ऑक्सिजन पुरवणारा मुंबईकर चर्चेत

स्वत:ची SUV कार विकून गरजूंना ऑक्सिजन पुरवणारा मुंबईकर चर्चेत

sakal_logo
By
विराज भागवत

महाराष्ट्रात सध्या कोरोनाचं संकट दिवसेंदिवस बिकट होत आहे. कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने वैद्यकीय सेवांचा तुटवडा दिसून येत आहे. कोरोनावर परिणामकारक ठरणारं रेमडेसिवीर आणि उपचारासाठी लागणारा वैद्यकीय ऑक्सिजन या दोन गोष्टींची मागणी प्रचंड आहे. पण त्या प्रमाणात पुरवठा होणं शक्य होत नाही अशी परिस्थिती आहे. राज्यातील अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा असतानाच मुंबईतील एक तरूण अनेकांना जीवनदान देणारा दूत ठरताना दिसतोय. आपली स्वत:ची SUV कार विकून तो गरजूंना ऑक्सिजन सिलिंडर पुरवण्याचं कार्य करत आहे. त्याच्या या कृत्याचं सोशल मीडियावर जोरदार कौतुक होताना दिसतंय.

हेही वाचा: सलाम तिच्या कार्याला! बेवारस मृतदेहांना 16 वर्षांची मुलगी देतेय अग्नी

शहनवाझ शेख असं या तरूणाचं नाव आहे. शहनवाझने आपली फोर्ड एन्डेव्हर ही आलिशान SUV कार गेल्या वर्षी विकली आणि त्यातून मिळालेल्या पैशाचा वापर गरजूंना ऑक्सिजन सिलिंडर पुरवण्यासाठी केला. मुंबईच्या मालाड-मालवणी भागात सध्या शहनवाझ शेख हा लोकांसाठी जीवनदान देणार दूत ठरताना दिसत आहे. गेल्या वर्षी त्याने आपली कार विकून त्या पैशाचा वापर ऑक्सिजन सिलिंडर्स विकत घेण्यासाठी केला. त्यामुळे हा तरूण चर्चेत आला होता.

हेही वाचा: हे वाचून मला तर धक्काच बसला- राज ठाकरे

"गेल्या वर्षी जेव्हा आम्ही ऑक्सिजन पुरवण्याचं कार्य हाती घेतलं तेव्हा आम्ही साधारणपणे ५ ते ६ हजार लोकांना मदत केली. गेल्या वर्षी आम्हाला दिवसाला अंदाजे ५० फोन येत होते. यंदा मात्र राज्यात आणि शहरात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. त्यामुळे आम्हाला दिवसाला सुमारे ५०० ते ६०० फोन येत आहेत", अशी माहिती शहनवाझ शेख यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये शहनवाझच्या मित्राच्या नातेवाईकाचा मृत्यू झाला होता. त्या नातेवाइकाला ऑक्सिजनची पुरवठा वेळीच झाला असता तर जीव वाचवणे शक्य झाले असते. या घडलेल्या प्रकारानंतर शहनवाझ याने आपली कार विकून आपल्या सहकाऱ्यांसोबत गरजूंना ऑक्सिजन पुरवठा करण्याचा निर्णय घेतला.