'कौन बनेगा मुख्यमंत्री'; कर्नाटकमध्ये राजकीय नाट्याला वेग! 

मंगळवार, 15 मे 2018

बंगळूर : कर्नाटक विधानसभेच्या मतमोजणीत सकाळपासून सुरू झालेले नाट्य दहा तासांनंतरही तसेच कायम आहे. किंबहुना, विधानसभेचा निकाल त्रिशंकूच्या दिशेने जाऊ लागल्याने आता राज्यपाल वजुभाई बाला हे सर्व घडामोडींच्या केंद्रस्थानी आले आहेत. 

बंगळूर : कर्नाटक विधानसभेच्या मतमोजणीत सकाळपासून सुरू झालेले नाट्य दहा तासांनंतरही तसेच कायम आहे. किंबहुना, विधानसभेचा निकाल त्रिशंकूच्या दिशेने जाऊ लागल्याने आता राज्यपाल वजुभाई बाला हे सर्व घडामोडींच्या केंद्रस्थानी आले आहेत. 

भाजपला कर्नाटकमध्ये सर्वाधिक जागा मिळाल्या. तरीही स्पष्ट बहुमतापासून भाजप लांबच असल्याने काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाने (जेडीएस) राजकीय डावपेच लढवून निकालोत्तर आघाडी करत सत्तास्थापनेचा दावा केला. मणिपूर आणि गोवा येथील विधानसभा निवडणुकीच्या घडामोडींतून धडा घेत काँग्रेसने यावेळी वेळीच हालचाल केली. त्यामुळे भाजप सत्ता मिळाल्याच्या आनंदात असतानाच काँग्रेसने अचानक 'जेडीएस'ला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. यामुळे भाजपला सत्तेबाहेर राहावे लागण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे. 

सर्वमान्य प्रथेप्रमाणे, राज्यातील सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या पक्षाला किंवा निवडणूकपूर्व आघाडी राज्यपाल सत्तास्थापनेसाठी निमंत्रण देतात. त्रिशंकू परिस्थिती असेल, तर अशा वेळी बहुमत सिद्ध करण्याच्या सूचनाही देतात. काँग्रेस आणि 'जेडीएस'मध्ये निवडणूकपूर्व आघाडी नव्हती. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी भाजपला संधी द्यायची की काँग्रेस-जेडीएसला निमंत्रण द्यायचे, हा पेच राज्यपालांसमोर असेल. 

काँग्रेसच्या या डावपेचांमुळे भाजपला प्रथमच कोंडीत सापडल्याचा अनुभव येत आहे. दक्षिणेकडील राज्यात सत्ता स्थापन करण्याच्या भाजपच्या स्वप्नावर सध्या तरी पाणी पडले आहे. याचमुळे पक्षाने तब्बल तीन वरिष्ठ मंत्र्यांना बंगळूरमध्ये धाडले आहे. यात धर्मेंद्र प्रधान, प्रकाश जावडेकर आणि जेपी नड्डा यांचा समावेश आहे. संभाव्य आघाडीची चर्चा करण्याची जबाबदारी या तिघांवर आहे. 

दरम्यान, भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडियुरप्पा यांनी सायंकाळी पाचच्या सुमारास राज्यपालांची भेट घेतली. येडियुरप्पा राजभवनातून बाहेर पडल्यानंतर काही मिनिटांतच 'जेडीएस'चे नेते कुमारस्वामी राजभवनात दाखल झाले. काही वेळातच काँग्रेसचे नेते सिद्धरामय्याही राजभवनात आले. यावेळी त्यांच्याबरोबर लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद होते. 

दुसरीकडे, या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर भाजपने सायंकाळी दिल्लीतील मुख्यालयात तातडीची महत्त्वाची बैठक बोलाविली आहे. 

Web Title: Governor at the center stage in Karnataka Elections