GST : नोव्हेंबरमध्ये दीड लाख कोटी रुपयांहून अधिक कमाई

सरकारला नोव्हेंबरमध्ये ‘जीएसटी’ अर्थात वस्तू आणि सेवा कराच्या माध्यमातून १.४६ लाख कोटी रुपये महसूल प्राप्त झाला
govt 1.5 Lakh Crore revenue collected
govt 1.5 Lakh Crore revenue collected

नवी दिल्ली : सरकारला नोव्हेंबरमध्ये ‘जीएसटी’ अर्थात वस्तू आणि सेवा कराच्या माध्यमातून १.४६ लाख कोटी रुपये महसूल प्राप्त झाला. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरच्या तुलनेत त्यात ११ टक्के वाढ झाली आहे. मात्र ऑक्टोबरच्या तुलनेत तो चार टक्के कमी आहे. सलग नवव्या महिन्यात मासिक ‘जीएसटी’ संकलन १.४० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. वित्त मंत्रालयाने आज ही आकडेवारी जाहीर केली.

“नोव्हेंबरमधील जीएसटी महसूल हा गेल्या वर्षीच्या याच महिन्यातील १.३१ लाख कोटी रुपयांपेक्षा ११ टक्के जास्त आहे. या महिन्यात वस्तूंच्या आयातीतून मिळणारा महसूल २० टक्क्यांनी जास्त होता आणि देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) महसूल हा गेल्या वर्षीच्या याच महिन्यात या स्रोतांमधून मिळालेल्या महसुलापेक्षा आठ टक्क्यांनी जास्त आहे, असे वित्त मंत्रालयाने म्हटले आहे. ऑक्टोबर महिन्यात १.५२ लाख कोटी रुपये जीएसटी संकलन झाले होते.

ते चालू आर्थिक वर्षातील दुसरे सर्वाधिक जीएसटी संकलन होते. त्या आधी एप्रिलमध्ये १.६८ लाख कोटी रुपये इतके संकलन झाले होते. महिन्यातील नियमित सेटलमेंटनंतर, केंद्रीय जीएसटी ५९,६७८ कोटी रुपये आणि राज्याचा जीएसटी ६१,१८९ कोटी रुपये होता. याशिवाय, केंद्राने या महिन्यात राज्यांना जीएसटी भरपाई म्हणून १७ हजार कोटी रुपये जारी केले होते.

आठ राज्यांत वाढ

नोव्हेंबरमध्ये आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या संकलनात १४ टक्के किंवा त्याहून अधिक वाढ झाली. यात बिहार २८ टक्के, अरुणाचल प्रदेश ५५ टक्के, मणिपूर ४२ टक्के, दीव दमण ६७ टक्के, महाराष्ट्र १६ टक्के, पुदुच्चेरी २२ टक्के, आंध्र प्रदेश १४ टक्के आणि लडाख २७३ टक्के अशी वाढ झाली. केंद्राकडून जीएसटी भरपाई मिळण्याचा कालावधी जूनमध्ये संपत आहे.

जीएसटी वर्गवारी (आकडेवारी कोटी रुपयांत)

  • केंद्रीय जीएसटी - २५,६८१

  • राज्य जीएसटी - ३२,६५१

  • एकात्मिक जीएसटी - ७७,१०३

  • वस्तू आयात कर - ३८,६३६

  • अधिभार - १०,४३३

ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमधील संकलनात झालेली घट तिमाहीअखेरच्या पेमेंटमधील वाढ दर्शवते. कारण प्रत्येक महिन्यात होणारे संकलन मागील महिन्यातील आर्थिक उलाढालींशी निगडीत आहे. ऑक्टोबरमध्ये सणासुदीचा खर्च जास्त होता, मात्र त्या महिन्यात जास्त सुट्ट्या असल्याने ‘जीएसटी’च्या ‘ई-वे’ बिलांची निर्मिती कमी झाली.

- आदिती नायर, मुख्य अर्थशास्त्रज्ञ, इक्रा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com