"जीसॅट-11' बुधवारी अवकाशात झेपावणार

वृत्तसंस्था
रविवार, 2 डिसेंबर 2018

"इस्रो'च्या उपग्रहाचे फ्रेंच गयानातून होणार प्रक्षेपण 

बंगळूर- भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) तयार केलेला आत्तापर्यंतचा सर्वाधिक वजनदार उपग्रह जीसॅट-11चे पाच डिसेंबर रोजी फ्रेंच गयाना येथून प्रक्षेपण केले जाणार आहे. युरोपियन अवकाश संस्था एरियनस्पेसच्या एरियन-5 रॉकेटच्या साह्याने जीसॅट-11चे प्रक्षेपण केले जाणार आहे, अशी माहिती इस्रोकडून आज देण्यात आली.

सुमारे पंधरा वर्षांचे आयुष्य असलेल्या जीसॅट-11 उपग्रहाचे वजन पाच हजार 854 किलोग्रॅम आहे. हा उपग्रह देशभरात ब्रॉडबॅंड सेवा पुरविण्यात महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. जीसॅट-11 हा इस्रोने निर्मिती केलेला सर्वाधिक वजनाचा उपग्रह आहे. या उपग्रहाचे 25 मे रोजी प्रक्षेपण केले जाणार होते. मात्र, काही अतिरिक्त तांत्रिक तपासण्यांसाठी त्याचे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले होते, असे इस्रोकडून सांगण्यात आले.

पाच डिसेंबर रोजी फ्रेंच गयानातून भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 2.07 मिनिटे ते 3.23 मिनिटांच्या दरम्यान अवकाशात पाठविला जाणार आहे. दळणवळणाची अत्याधुनिक सुविधा पुरविणारा जीसॅट-11 हा नव्या पिढीतील उपग्रह मानला जातो.

एरियना-5 रॉकेटच्या साह्याने जीसॅट-11 आणि कोरियन अवकाश संशोधन संस्थेच्या "जीईओ-केओएमपीएसएटी-2ए' या उपग्रहांचे अवकाशात प्रक्षेपण केले जाणार आहे.

Web Title: GSAT-11 satellite to be launched from French Guiana on Dec 5