मोदी सरकारचा "जीएसटी' चुकीचा : चिदंबरम

पीटीआय
शुक्रवार, 7 जुलै 2017

नवी दिल्ली - केंद्रातील मोदी सरकारने लागू केलेला वस्तू व सेवाकर (जीएसटी) हा अत्यंत चुकीचा असून त्याला एक राष्ट्र एक कर म्हणता येणार नाही, अशी टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री व कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी केली.

नवी दिल्ली - केंद्रातील मोदी सरकारने लागू केलेला वस्तू व सेवाकर (जीएसटी) हा अत्यंत चुकीचा असून त्याला एक राष्ट्र एक कर म्हणता येणार नाही, अशी टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री व कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी केली.

पी. चिदंबरम यांनी राजधानी दिल्लीत गुरुवारी पत्रकार परिषद घेत जीएसटी अंमलबजावणीच्या अनुषंगाने मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. मोदी सरकारने लागू केलेला "जीएसटी' ही तज्ज्ञांनी शिफारस केलेली व आम्ही कल्पना केलेली करपद्धती नाही, असे ते म्हणाले. "जीएसटी' सात किंवा आठ दरात असू शकतो का, असा सवाल करत विविध अप्रत्यक्ष करांऐवजी देशभरात एकच करप्रणाली लागू करणे हा "जीएसटी'चा मूळ उद्देश होता. पण या उद्देशालाच मोदी सरकारच्या "जीएसटी'ने हरताळ फासल्याचा आरोप केला.

"जीएसटी'ची अंमलबजावणी आणखी दोन महिन्यांनीदेखील करता आली असती. "जीएसटी'चा मूळ उद्देश देशात एक करप्रणाली लागू करण्याचा होता. मोदी सरकारच्या जीएसटीने ही अपेक्षा अजूनही पूर्ण झालेली नाही. सध्या 0.25, 3, 5, 12, 18, 28, 40 असे कर दराचे स्तर ठरविण्यात आले आहेत. यामध्ये आणखी वाढ होईल. मग हा एक राष्ट्र एक कर कसा, असेही ते म्हणाले.

सत्तेचे विकेंद्रीकरण व त्यामाध्यमातून गैरवापर करणे आदी प्रकारांवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत. सध्या भारतातील व्यवसाय व व्यावसायिक जीएसटीसाठी तयार नसल्याचे चित्र आहे. मात्र तरीही घाईघाईत जीएसटी लागू करण्यात आला. जीएसटीची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी करणे गरजेचे होते, मात्र तसे झाले नाही, असेही चिदंबरम यांनी सांगितले. पेट्रोलियम पदार्थ, रिअल इस्टेट आणि विद्युत पुरवठा या क्षेत्रांनाही वस्तू आणि सेवा कराच्या कक्षेत (जीएसटी) आणावे, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी केली आहे.

दरम्यान, वाजपेयी सरकारमधील अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनीही मोदी सरकारने लागू केलेला "जीएसटी' हा "एनडीए' सरकारच्या काळात कल्पना केलेला जीएसटी नसल्याचे सांगितले असल्याचेही चिदंबरम यांनी सांगितले.

मूळ "जीएसटी'साठी मोहीम
कॉंग्रेस हा "जीएसटी'चा मूळ प्रवर्तक होता. त्यामुळे देशाच्या हिताचा मूळ "जीएसटी' लागू व्हावा, या मागणीसाठी कॉंग्रेस पक्षाकडून मोहीम राबविण्यात येईल, अशी माहिती चिदंबरम यांनी दिली.

Web Title: gst chidambaram new delhi news india news marathi news sakal news