
Gujarat Assembly Election : भाजप व काँग्रेसमध्ये चुरस
गांधीनगर : अहमदाबाद शहरातील अल्पसंख्याक आणि दलितबहुल दानिलिमडा विधानसभा मतदारसंघावर वर्चस्व मिळविण्यासाठी भाजप आणि काँग्रेस यांच्यात प्रतिष्ठेची लढत आहे. दानिलिमडा जागेवर पराभवाची परंपरा यंदा खंडित होईल, अशी आशा भाजपला आहे. काँग्रेसच्या मतांचे विभाजन करण्यासाठी भाजपचे नियोजन फळाला येईल, अशी आशा भाजपला वाटत आहे.
दानिलिमडाची न जिंकल्याची खंत
दानिलिमडाची जागा जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली. ‘विद्यमान आमदाराविरोधात नाराजी आहे. त्यांनी काहीही केलेले नाही. यातच त्यांच्या पराभवाची बीजे रुजलेली आहेत. या मतदारसंघांत भाजपला अद्याप यश मिळाले नसले तरी आम्ही ही कोंडी फोडू, असा दावा करताना या मतदारसंघाच्या आजूबाजूच्या भागात भाजप बळकट असूनही ही जागा जिंकता आली नाही, अशी खंत भाजपचे उमेदवार नरेशभाई व्यास यांनी व्यक्त केली.
मतदारांची जात, वंश, धर्म आणि राजकीय बांधिलकी लक्षात न घेता दानिलिमडाचे आमदार शैलेश परमार हे मतदारसंघातील नागरिकांसाठी कायम उपलब्ध असतात. ते येथील लोकप्रिय आमदार आहेत. परमार यांनी मतदारसंघासाठी खूप कामे केली आहेत.
- मनीष दोशी, राज्य काँग्रेसचे नेते