esakal | गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी भूपेंद्र पटेल; आज शपथविधी
sakal

बोलून बातमी शोधा

गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी भूपेंद्र पटेल; आज शपथविधी

गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी भूपेंद्र पटेल; आज शपथविधी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गांधीनगर: गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांची निवड करण्यात आली. भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय निरीक्षक नरेंद्र तोमर यांनी या बाबतची घोषणा केली. सोमवारी दुपारी दोन वाजून 20 मिनिटांनी पटेल यांचा शपथविधी होणार आहे. त्यानंतर दोन दिवसानंतर मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. पटेल यांच्या शपथविधी सोहळ्याला गृहमंत्री अमित शाह आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहानही उपस्थित राहणार आहेत. गुजरात विधानसभेत एकूण १८२ पैकी ११२ आमदार भाजपचे आहे. पटेल हे २०१७ मध्ये घाटलोडिया मतदारसंघातून पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून आले आहेत. त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकी या विषयात पदविका घेतली आहे. माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचे ते जवळचे समर्थक मानले जातात.

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी अचानक पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर २४ तासांच्या आत भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये भूपेंद्र पटेल यांनी एकमताने निवड करण्यात आली. रुपानी यांनीच मुख्यमंत्रिपदासाठी पटेल यांचे नाव सुचविले. रुपानी यांच्या मंत्रिमंडळातील उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी त्यांच्या नावाला अनुमोदन दिले. मुख्यमंत्रिपदासाठी ज्या नावांची चर्चा होती, त्यापैकी एकाही नावावर चर्चा झाली नाही. आश्चर्यकारकरीत्या भूपेंद्र पटेल यांची निवड करण्यात आली.

हेही वाचा: ...अन्यथा सक्तीची स्वेच्छानिवृत्ती, गडकरींचे अधिकाऱ्यांना खडेबोल

गुजरातमध्ये पुढील वर्षी डिसेंबरमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यापूर्वीच मुख्यमंत्रिपदासाठी नवा चेहरा देऊन निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. या निर्णयामागचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. रुपानी हे ७ ऑगस्ट २०१६ रोजी मुख्यमंत्री झाले होते. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी राजीनामा दिला होता. रुपानी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने २०१७ रोजीची विधानसभा निवडणूक जिंकली होती. रुपानी यांची मुख्यमंत्रिपदी पाच वर्षे नुकतीच पूर्ण झाली. आता त्यांनी राजीनामा दिला असून, नव्या नेतृत्वाखाली पुढील निवडणूक लढविली जाणार आहे.

गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी निवड झाल्याबद्दल आपले अभिनंदन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या नेतृत्वात राज्यातील विकास यात्रेला नवी ऊर्जा व गती मिळेल आणि गुजरात सुशासन व जनतेच्या कल्याणात अग्रेसर राहील.

- अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

loading image
go to top