गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर तातडीने उतरवले

पीटीआय
रविवार, 28 मे 2017

हेलिकॉप्टमध्ये बिघाड झाल्याचे लक्षात येताच त्याच्या चालकाने याची माहिती तात्काळ एटीसीला दिली. त्यानंतर हे हेलिकॉप्टर सुखरूप उतरले व सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

अहमदाबाद : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांना घेऊन निघालेले हेलिकॉप्टर तांत्रिक बिघाडामुळे येथील सरदार वल्लभभाई विमानतळावर तातडीने उतरविण्यात आले. रूपानी यांच्यासमोर असा प्रसंग उद्भवण्याची ही दुसरी वेळ ठरली.

दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरचे क्रॅश लॅडिंग झाल्याची घटना ताजी असतानाच आज विजय रूपानी यांना या प्रसंगातून जावे लागले. रूपानी त्यांचे सचिव शैलेश मंडालिया यांच्यासह वलसाड जिल्ह्यातील उमरगाव येथून हिम्मतनगरकडे निघाले होते. हेलिकॉप्टमध्ये बिघाड झाल्याचे लक्षात येताच त्याच्या चालकाने याची माहिती तात्काळ एटीसीला दिली. त्यानंतर हे हेलिकॉप्टर सुखरूप उतरले व सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

यापूर्वी जानेवारी महिन्यात रूपानी राज्यपाल ओ. पी. कोहली यांसमवेत गांधीनगरकडे निघाले असताना हेलिकॉप्टरमध्ये बिघाड होऊन ते उड्डाण भरू शकले नव्हते. रूपानी यांसह विविध राज्यांच्या मंत्र्यांसाठी उपलब्ध असलेली हेलिकॉप्टर ही कालबाह्य झालेली असून, त्याचा वापर म्हणजे एकप्रकराचा धोकाच आहे.

Web Title: gujarat news gujarat chief minister helicopter emergency landing