गुजरातेत पाटीदारांची "शहीद यात्रा' सुरू

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 26 जून 2018

 "पाटीदार शहीद यात्रे'च्या माध्यमातून आपले आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय हार्दिक पटेल यांच्या पाटीदार अनामत आंदोलन समितीने (पास) केला असून, कालपासून उत्तर गुजरातमधील ऊंझामधून ही यात्रा सुरू झाली. अहमदाबादेत 25 ऑगस्ट 2015 मध्ये आंदोलकांवर झालेल्या पोलिस गोळीबारात 14 पाटीदार युवक ठार झाले होते. त्यांना न्याय देण्यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. 

अहमदाबाद - "पाटीदार शहीद यात्रे'च्या माध्यमातून आपले आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय हार्दिक पटेल यांच्या पाटीदार अनामत आंदोलन समितीने (पास) केला असून, कालपासून उत्तर गुजरातमधील ऊंझामधून ही यात्रा सुरू झाली. अहमदाबादेत 25 ऑगस्ट 2015 मध्ये आंदोलकांवर झालेल्या पोलिस गोळीबारात 14 पाटीदार युवक ठार झाले होते. त्यांना न्याय देण्यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. 

लोकसभेची निवडणूक पुढील वर्षी होत असल्याने सत्तारूढ भाजपवर दबाव आणण्यासाठी "पास'ने हा निर्णय केल्याचा अंगाद आहे. चार हजार किलोमीटर अंतर कापणारी ही "पाटीदार शहीद यात्रा' एक महिना चालणार असून, सौराष्ट्र आणि उत्तर गुजरातेतील पाटीदारबहुल 11 जिल्ह्यांतून जाऊन राजकोटमधील केलावदमध्ये तिचा समारोप होईल. पाटीदार समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावे ही "पास'ची मुख्य मागणी आहे. आंदोलनाच्या काळात मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना भरपाई, या कुटुंबीयांना सरकारी नोकऱ्या आणि 14 युवकांच्या मृत्युला कारणीभूत असलेल्या पोलिसांवर कारवाई करावी, याही मागण्या आहेत. 

ही यात्रा मेहसाणामधून बाहेर पडल्यावर हार्दिक तीत सहभागी होण्याची शक्‍यता आहे. त्यांना मेहसाणा जिल्ह्यात प्रवेशबंदी आहे. आंदोलनात ठार झालेल्यांना न्याय मिळावा म्हणून ही यात्रा काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पाटीदार समजाला दिलेली आश्‍वासने सरकारने पूर्ण केली नाहीत, अशी टीका यात्रेचे संयोजक राहुल देसाई यांनी केली. 

Web Title: In Gujarat Patidar's Shahid Yatra started