हायकोर्टाच्या जस्टीसनी केलं पंतप्रधानांचं तोंडभरुन कौतुक; 'मोदी लोकप्रिय आणि चैतन्यशील नेते'

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 7 February 2021

न्या. शाह यांनी 2018 मध्ये पटना हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली तेव्हाही पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदी यांना मॉडेल आणि हिरो म्हणून संबोधलं होतं.

अहमदाबाद : गुजरात हायकोर्टाचे जस्टीस एम आर शाह यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वांत लोकप्रिय, प्रिय आणि चैतन्यशील नेते अशा शब्दात कौतुक केलं आहे. गुजरात हायकोर्टाच्या हिरक महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका टपाल तिकीटाचे व्हर्चुअल कार्यक्रमात उद्घाटन करण्यात आले. त्या कार्यक्रमामध्ये शाह बोलत होते. गुजरात हायकोर्टाला 60 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त टपाल तिकीटाचे उद्घाटन सर्वाधिक लोकप्रिय, सक्षम आणि दूरदृष्टी असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे, याचा मला अभिमान आहे. तसेच या कार्यक्रमाला मला बोलावण्यात आले याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो. असे म्हणतच त्यांनी भाषणाची सुरवात केली. 

हेही वाचा - आमदारांना आपल्याच पैशातून आयपॅड खरेदी करावा लागणार

पुढे त्यांनी म्हटलं की, भारतीय राज्यघटनेअंतर्गत लोकशाहीच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य असं आहे की, कायदेमंडळ, प्रशासन आणि न्यायपालिका यांच्यात फारकत असली पाहिजे. मला हे सांगायला अभिमान वाटत आहे की, गुजरात उच्च न्यायलयाने ही लक्ष्मण रेषा कधीच पार केली नाही तसेच नेहमी न्याय प्रदान केला. पुढे जस्टीस शाह यांनी गुजरात उच्च न्यायालय ही आपली कर्मभूमी असल्याचं सांगितलं. या न्यायालयात मी 22 वर्ष वकील म्हणून तर 14 वर्ष न्यायाधीश म्हणून सेवा दिली आहे, असंही त्यांनी म्हटलं. न्या. शाह यांनी 2018 मध्ये पटना हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली तेव्हाही पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदी यांना मॉडेल आणि हिरो म्हणून संबोधले होते.

विशेष म्हणजे, याआधी मागच्या वर्षी सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांनी एका समारंभात पंतप्रधान मोदी यांची प्रशंसा केली होती.  एका जाहीर कार्यक्रमात "पंतप्रधान नरेंद्र मोदी थिंक्स ग्लोबली अँड एक्ट्स लोकली" असे वक्तव्य केले होते. यावर सुप्रीम कोर्टाच्या बार असोसिएशनने न्यायमूर्ती मिश्रा यांचे वक्तव्य स्वतंत्र न्याय व्यवस्थेला न शोभणारे असल्याचा ठपका ठेवत त्यांच्या निषेधाचा ठराव केला होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, कोरोना महासंकटाच्या काळात देशातील न्यायालयांनी अत्याधुनिक अशा तंत्रज्ञानाचा वापर करुन आपले काम सुरू ठेवले ही अभिमानास्पद गोष्ट आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिद्वारे सर्वाधिक सुनावणी घेणारे सुप्रीम कोर्ट हे जगातील पहिले कोर्ट ठरले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gujrat high court justice mr shah lauded for pm modi