गुरमेहरच्या समर्थकांना देशाबाहेर हाकला- भाजप मंत्री

वृत्तसंस्था
बुधवार, 1 मार्च 2017

एका हुतात्मा जवानाची मुलगी पाकिस्तानला क्लिनचीट देते हे योग्य नाही. भारतातील गुरमेहरचे समर्थक हे पाकिस्तानचे समर्थक आहेत. ते देशविरोधी वक्तव्ये करत आहेत.

नवी दिल्ली - अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेविरोधात (अभाविप) आवाज उठविणाऱ्या हुतात्मा अधिकाऱ्याची मुलगी गुरमेहर कौरचे समर्थन करणारे पाकिस्तानचे समर्थक आहेत. त्यांना देशात रहायचा अधिकार नाही. त्यांना देशाबाहेर हाकलून दिले पाहिजे, असे वक्तव्य हरियानातील भाजपचे मंत्री अनिल विज यांनी केले आहे.

'जेएनयू'मधील विद्यार्थी उमर खालिद आणि शेहला मसूद यांना चर्चासत्रासाठी आमंत्रित करण्यावरून तणाव निर्माण झाला होता. कारगिलमधील हुतात्मा कॅप्टन मनदीपसिंह यांची मुलगी गुरमेहर कौर हिने सोशल मीडियावर 'अभाविपला मी घाबरत नाही' असा प्रचार सुरू केला. तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. वीरेंद्र सेहवागसह बॉलिवूडमधून याविषयी प्रतिक्रिया देण्यात आल्या. अनेकांनी तिच्या समर्थनार्थ तर विरोधातही प्रतिक्रिया दिल्या आहेत.

विज म्हणाले, की गुरमेहर वडिलांच्या हुतात्म्यावर राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे. एका हुतात्मा जवानाची मुलगी पाकिस्तानला क्लिनचीट देते हे योग्य नाही. भारतातील गुरमेहरचे समर्थक हे पाकिस्तानचे समर्थक आहेत. ते देशविरोधी वक्तव्ये करत आहेत. अशा लोकांना देशात रहायचा अधिकार नाही.

Web Title: gurmehar kaur supporters are pro pakistan should be thrown out of country says anil vij