घरी लक्ष्मी आली! बाप माणूस झाल्याच्या आनंदात सलमानने दिली फ्री सलून सेवा

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 6 January 2021

बऱ्याचदा जर मुलगी झाली तर आनंद साजरे करणारे फार कमी लोक असतात

ग्वाल्हेर: आपल्या समाजात जर मुलगा झाला तर लोकं त्याचा उत्साहाने स्विकार करतात. पण बऱ्याचदा जर मुलगी झाली तर आनंद साजरे करणारे फार कमी लोक असतात. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर मध्ये एका सलून मालकाने आपल्या मुलीच्या जन्माचा अनोखा आनंद साजरा केला आहे. या सलून मालकाचं नाव सलमान आहे. 

घरामध्ये मुलगी झाल्याच्या आनंदात सलमानने 24 तासांसाठी सलूनची सेवा फ्री केली होती. मुलीच्या जन्माच्या आनंदात सलून मालक सलमानने 4 जानेवारीला शहरातील त्याच्या तीनही सलूनमध्ये मोफत सेवा दिली आहे. सलमान माध्यमांशी बोलताना म्हणाला, घरात मुलीचा जन्म झाल्याने मी खूप खूश आहे.'  मुलीच्या जन्मावर लोकांनी दुःखी होऊ नये, असंही सलमानने सांगितलं.

रिपोर्ट्सनुसार, सलमानचे ग्वाल्हेरमध्ये तीन सलून आहेत. ज्यांच्या सर्व सेवा एका दिवसासाठी मोफत ठेवण्यात आल्या होत्या. कोणीही येऊन मोफत कटिंग आणि दाढी करू शकत होतं. ही गोष्ट जेंव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाली तेंव्हा लोकांनी तिन्ही दुकानांमध्ये गर्दी केली होती.

पती हर्षवर्धनविरोधात संजना जाधव निवडणुकीच्या रणांगणात, मुलाचे आईविरुद्ध पॅनल

सलमान म्हणाला की, तिन्ही दुकानांमधील त्याच्या कर्मचाऱ्यांनी 400 लोकांना मोफत सेवा पुरवली. यासाठी ते सतत 15 तास काम करत होते. जेव्हा लोकांना मोफत सलून सेवेची माहिती मिळाली तेव्हा लोक सकाळपासून तिन्ही दुकानांमध्ये येऊ लागले. लोकही आपल्या बारीसाठी चार-चार तास वाट पाहत होते.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gwalior Salman offers free salon service in joy of having a daughter