पती हर्षवर्धनविरोधात संजना जाधव निवडणुकीच्या रणांगणात, मुलाचे आईविरुद्ध पॅनल

संतोष शिंदे
Wednesday, 6 January 2021

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून विविध कारणांमूळे चर्चेत असलेली कन्नड तालुक्यातील पिशोर ग्रामपंचायत सध्या मुलाविरुद्ध आईचे पॅनल अशा लक्षवेधी लढतीने पुन्हा एकदा राज्यभर चर्चेत आली आहे.

पिशोर (जि.औरंगाबाद) : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून विविध कारणांमूळे चर्चेत असलेली पिशोर ग्रामपंचायत सध्या मुलाविरुद्ध आईचे पॅनल अशा लक्षवेधी लढतीने पुन्हा एकदा राज्यभर चर्चेत आली आहे. सहा प्रभागाच्या एकूण सतरा जागांसाठी या निवडणुकीत उमेदवार नशीब आजमावत आहेत. हर्षवर्धन जाधव समर्थक कै. रायभानजी जाधव ग्राम विकास पॅनल, संजनाताई जाधव समर्थक ग्रामविकास पॅनल, माजी सरपंच पुंडलिक डहाके यांचे शिवशाही ग्राम विकास पॅनल, माजी सरपंच नारायण मोकासे यांचे लोकशक्ती ग्रामविकास पॅनल आणि राजेंद्र मोकासे व माजी उपसरपंच नारायण जाधव यांचे आदर्श परिवर्तन ग्रामविकास पॅनल अशी एकूण पंचरंगी चुरशीची लढत या वेळी पाहावयास मिळणार आहे. 

 

औरंगाबाद रेल्वेस्थानकाला पोलिस संरक्षण, नामांतरासाठी मनसेकडून आंदोलनाची शक्यता

पती, मुलगा विरुद्ध पत्नी- अनोखी लढत : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजनाताई जाधव आणि श्री. दानवे यांचे जावई माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचे पॅनल समोरासमोर असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या ग्रामपंचायतीकडे वेधले गेले आहे. रावसाहेब दानवे, संजनाताई जाधव-दानवे आणि हर्षवर्धन जाधव यांचे घरगुती वाद, श्री.जाधव यांची राजकीय संन्यास घेण्याची घोषणा यामुळे अगोदरच चर्चेत असलेले पिशोर गाव ऐन निवडणुकीच्या काळात हर्षवर्धन जाधव यांना पुण्यात एका प्रकरणात अटक झाल्याने पुन्हा चर्चेत आले. जाधव यांना कोर्टाने जामीन फेटाळल्याने हर्षवर्धन जाधव यांचे समर्थक सुरवातीला काळजीत पडले होते. परंतु जाधव घराण्यातील तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करणाऱ्या सतरा वर्षीय आदित्यवर्धन जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन हर्षवर्धन जाधव यांच्या राजकारणात पुन्हा परतण्याची व ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याची घोषणा केली आणि निवडणुकीची सर्व सूत्रे हातात घेतली. हर्षवर्धन जाधव समर्थक कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ झटकली गेली.यामुळे निवडणुकीचे चित्र बऱ्याच प्रमाणात पालटले आहे.

 

मेहबूब शेख प्रकरणी पीडित तरुणीने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा - निलम गोऱ्हे

सख्खे नातेवाईक एकमेकांच्या विरोधात : इतर तीन पॅनलमध्ये सुद्धा काही दिग्गज आणि मजेदार लढती पाहायला  मिळणार आहे. प्रभाग क्रमांक एकमध्ये आजी विरुद्ध नात, प्रभाग क्रमांक चार मध्ये आत्या विरुद्ध भाची, प्रभाग क्रमांक पाच मध्ये काकू विरुद्ध पुतणी अशा मजेदार लढती होणार आहेत. माळी, मराठा, मुस्लिम व इतर जातीच्या मतांवर डोळा ठेवत सर्व पॅनल प्रमुखांनी उमेदवारी देतांना संतुलन साधण्याचा प्रयत्न केला आहे.  माजी सरपंच नारायण मोकासे यांच्या लोकशक्ती विकास पॅनल व पुंडलिक डहाके यांच्या शिवशाही विकास पॅनेलने संपूर्ण सतरा जागांसाठी, माजी उपसरपंच नारायण जाधव व राजेंद्र मोकासे यांच्या आदर्श परिवर्तन ग्राम विकास पॅनल व कै. रायभानजी जाधव ग्राम विकास पॅनल यांनी सोळा जागांसाठी आणि बाळासाहेब जाधव यांच्या संजनताई जाधव समर्थक पॅनल ने आठ जागांसाठी उमेदवार दिलेले आहेत. या सोबत अनेक उमेदवार अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत.

डिजिटल प्रचारावर जोर : यावेळी ऑडिओ, व्हिडीओ द्वारे डिजिटल प्रचारावर बहुतेक उमेदवारांचा व पॅनलच्या प्रचारावर प्रभाव दिसून येत आहे. या मुळे कोणताही खर्च न करता किंवा अत्यल्प खर्चात प्रचार करण्याचे तंत्र ग्रामीण भागात लोकप्रिय झाल्याचे चित्र सगळीकडे दिसते आहे.

सरपंच पदावर डोळा ठेवून उमेदवारी : ग्रामपंचायत निकालानंतर सरपंच पदाचे आरक्षण घोषित होणार आहे. परंतु येथील सरपंच पदाचे आरक्षण सर्वसाधारण किंवा राखीव प्रवर्गातून महिलासाठी सुटण्याची दाट शक्यता असल्याने सरपंच आपल्या पॅनलला व घरातील सदस्याला मिळावे या अपेक्षेने अनेकांनी आपली पत्नी, मुलगी, आई किंवा कट्टर समर्थक कार्यकर्त्याच्या नातेवाईक महिलांना उमेदवारी दिली आहे.

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Harshvardhan Jadhav Stand Before His Wife Sanjana Jadhav In Pishor Gram Panchayat Election