Gyanvapi row : नंदीची मूर्ती ठरणार ज्ञानवापी मंदिराचा पुरावा ? स्कंद पुराणातदेखील उल्लेख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gyanvapi nandi

Gyanvapi row : नंदीची मूर्ती ठरणार ज्ञानवापी मंदिराचा पुरावा ? स्कंद पुराणातदेखील उल्लेख

मुंबई : ज्ञानवापी मंदिराच्या सर्वेक्षणादरम्यान सापडलेले कथित शिवलिंग हे कारंजे असल्याचा दावा मुस्लिम पक्षाकडून केला जात आहे. दोन्ही पक्षांचे दावे अद्याप न्यायालयात सिद्ध झालेले नाहीत; मात्र तसे करण्यासाठी हिंदू पक्षकारांनी पुराणग्रंथांची पारायणे सुरू केली आहेत. अशातच ज्ञानवापी मशिदीत असणाऱ्या नंदीच्या मुखाची दिशा हा चर्चेचा विषय ठरत आहे. मंदिराच्या अस्तित्त्वाचा हाच खरा पुरावा असल्याचे मानले जात आहे.

ज्ञानवापी मशीद ही आधी मंदिर असल्याचा दावा करताना हिंदू पक्षकारांनी मशिदीच्या नावाला पहिला निकष बनवले आहे. ज्ञानवापी हे एखाद्या मशिदीचे नाव कसे असू शकते, असा त्यांचा प्रश्न आहे.

मंदिराच्या अस्तित्त्वाचा पुरावा देताना हिंदू पक्षकारांनी नंदीच्या मूर्तीला महत्त्वाचा निकष मानले आहे. नंदी हे शंकराचे वाहन आहे. शंकराच्या मंदिरात नंदीची मूर्ती आवर्जून साकारलेली असते व नंदीचे मुख शिवलिंगाच्या दिशेला असते. ज्ञानवापी मंदिरात ज्या ठिकाणी कथित शिवलिंग सापडले त्याच दिशेला नंदीचे मुख आहे.

हिंदूच्या मते ज्याला शिवलिंग मानले जात आहे ते मुस्लिम पक्षकारांच्या लेखी कारंजे आहे. मुस्लीम नागरिक नमाज पढण्याच्या आधी जेथे हात-पाय धुतात त्याला वजू म्हणतात. शिवलिंग सापडलेली जागा वजूची असल्याचे मुस्लिमांकडून सांगितले जात आहे.

सापडलेली शिळा हे कारंजे नसून ते शिवलिंग असल्याचे सिद्ध करण्यासाठी हिंदू पक्षकारांनी आता पुराणातील संदर्भ देण्यास सुरूवात केली आहे. या मंदिराचा उल्लेख स्कंद पुराणात असल्याचे सांगितले जात आहे.

स्कंद पुराणातील संदर्भ

स्कंद पुराणानुसार ईशान नावाचे एक रूद्र काशीला गेले होते. तेथे त्यांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले. या शिवलिंगाला स्नान घालण्याची त्यांची इच्छा झाली. त्यांनी विश्वेश्वराच्या दक्षिण दिशेला आपल्या त्रिशुळाने कुंड खोदले. त्यातील पाण्याने शिवलिंगाला स्नान घातले. विश्वेश्वराने प्रसन्न होऊन ईशानला वरदान दिले की हे शिवतीर्थ तिन्ही लोकांत सर्वश्रेष्ठ असेल. ज्ञानाला शिव असे म्हणतात. शिवमहात्म्यामुळे या ज्ञानाने कुंड व्यापले. त्यामुळे या कुंडाला ज्ञानवापी म्हटले जाते.

हिंदूंचा दावा

हिंदू पक्षकारांचा दावा आहे की, २ हजार ५० वर्षांपूर्वी महाराजा विक्रमादित्यने विश्वेश्वराचे मंदिर बांधले होते. त्याच्या दक्षिणेला ज्ञानवापी नावाचा कुंडही होता. त्याचा विध्वंस आधी महम्मद घुरी आणि सिकंदर लोदी यांच्या राज्यात झाला. त्यानंतर औरंगजेबाने विश्वेश्वराचे मंदिर तोडून तेथे मशीद बांधली.

टॅग्स :Babri Masjid