माजी कोळसा सचिव गुप्ता दोषी

पीटीआय
शनिवार, 20 मे 2017

गुप्ता यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांना आंधारात ठेवल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने गेल्या वर्षी ऑक्‍टोबरमध्ये संशयितांविरुद्ध आरोप निश्‍चित केले होते. कोळसा खाणवाटपात कायद्याचा भंग आणि विश्‍वासघात केल्याप्रकरणी गुप्ता यांना मुख्य आरोपी ठरविण्यात आले होते...

नवी दिल्ली - कोळसा गैरव्यवहारप्रकरणी एका विशेष न्यायालयाने शुक्रवारी माजी कोळसा सचिव एच. सी. गुप्ता यांना दोषी ठरविले.

विशेष केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) न्यायाधीश भरत पराशर यांनी मध्य प्रदेशातील रुद्रपुरी कोळसा खाणीचे केएसएसपीएल कंपनीला वाटप करताना गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाप्रकरणी कोळसा मंत्रालयाचे तत्कालीन सहसचिव के. एस. क्रोफा आणि तत्कालीन संचालक के. सी. सामरिया यांनाही दोषी ठरविले. न्यायालय 22 मे रोजी दोषींना शिक्षा सुनावणार आहे. दरम्यान, या प्रकरणातून चार्टर्ड अकाउंटंट अमित गोयल यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

गुप्ता, क्रोफा आणि सामरिया यांच्याशिवाय न्यायालयाने केएसएसपीएल कंपनी आणि या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पवन कुमार अहलुवालिया यांनाही दोषी ठरविले. क्रोफा त्या वेळी कोळसा मंत्रालयात सहसचिव, तर सामरिया हेसुद्धा मंत्रालयात त्या वेळी संचालक (कोळसा खाणवाटप) होते.

सुनावणी दरम्यान, कोळसा खाण अपूर्ण होती आणि मंत्रालयाने त्यास नकार द्यावा असा केएसएसपीएलने दाखल केलेला अर्ज मार्गदर्शक तत्त्वांनुसार जारी केला नसल्याचा आरोप सीबीआयने केला. कंपनीने त्याची एकूण किंमत आणि विद्यमान क्षमता यांची माहिती देताना दिशाभूल केली असून, राज्य सरकारनेही कंपनीला कोणत्याही कोळसा खाणीसाठी शिफारस केली नव्हती, असेही सीबीआयने नमूद केले. दरम्यान, आरोपींनी सुनावणी दरम्यान त्यांच्यावरील आरोप नाकारले.

गुप्ता यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांना आंधारात ठेवल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने गेल्या वर्षी ऑक्‍टोबरमध्ये संशयितांविरुद्ध आरोप निश्‍चित केले होते. कोळसा खाणवाटपात कायद्याचा भंग आणि विश्‍वासघात केल्याप्रकरणी गुप्ता यांना मुख्य आरोपी ठरविण्यात आले होते. सुमारे आठ वेगवेगळ्या आरोपांखाली गुप्ता यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले होते आणि वैयक्तिक पातळीवर त्याची सुनावणी सुरू होती. यातील सर्व प्रकरणांची एकत्रित सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच नकार दिला होता.

Web Title: H C Gupta convicted in coal scam