Haldwani Violence : बनभुलपुरा भागात संचारबंदी कायम, परिस्थिती नियंत्रणात; पाच जणांना अटक

बनभुलपुरा भागातील मलिक बागेजवळील बेकायदा मदरसा पाडल्यानंतर हिंसाचार उसळल्यानंतर लागू केलेली संचारबंदी आज तिसऱ्या दिवशी कायम ठेवण्यात आली.
Haldwani Violence
Haldwani Violence Sakal

लखनौ : बनभुलपुरा भागातील मलिक बागेजवळील बेकायदा मदरसा पाडल्यानंतर हिंसाचार उसळल्यानंतर लागू केलेली संचारबंदी आज तिसऱ्या दिवशी कायम ठेवण्यात आली. मात्र हल्दवानी शहराच्या बाह्य भागात संचारबंदी शिथिल केली आहे.

या प्रकरणाची न्यायदंडाधिकाऱ्यामार्फत चौकशीचे आदेश देण्यात आले असून पंधरा दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. कुमावचे आयुक्त दीपक रावत यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती अहवाल सादर करणार आहे.

बनभुलपुरा भागातील लष्कर छावणी, तिकोनिया-तीनपानी आणि गौलापार बाह्यवळण भागात संचारबंदी लागू असेल.पण नैनिताल बरेली मार्गावरच्या वाहतुकीला संचारबंदीतून वगळण्यात आले आहे.

या भागातील रुग्णालय आणि मेडिकल स्टोअर्स वगळता अन्य प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. दुसरीकडे शहराच्या बाह्य भागातील दुकाने आज सकाळी सुरू झाली, मात्र शाळा बंदच होत्या. याप्रकरणी तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात १६ जणांची नावे आहेत.

पैकी पाच जणांना अटक केली असून उर्वरित लवकरच पकडले जातील असे पोलिस महासंचालकांनी सांगितले. याशिवाय सोशल मीडियावर अफवांना पेव फुटू नये यासाठी इंटरनेट सेवा बंदच ठेवण्यात आली आहे. संवेदनशील बनभूलपुरा भागातील नागरिकांना अत्यावश्‍यक वस्तूंच्या खरेदीसाठी वेळोवेळी सवलत दिली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

गेल्या चोवीस तासात एकही अप्रिय घटना घडली नसून गुरुवारच्या घटनेत सहा जण ठार झाले तसेच ६० जण जखमी झाले. हिंसक जमावाच्या दगडफेकीत आणि पेट्रोल बॉम्बफेकीत जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यात काही पत्रकारांचा समावेश आहे. यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे.

मायावती यांच्याकडून चिंता

उत्तराखंडच्या हलद्वानी येथे बेकायदारित्या उभारलेली मदरसा पाडल्यानंतर उसळलेला हिंसाचार आणि त्यात झालेली मनुष्यहानी चिंताजनक आहे, असे बसपच्या नेत्या मायावती यांनी म्हटले आहे.

सरकारने पुरेशी खबरदारी घेतली असती तर हा प्रकार टळला असता, असे त्या म्हणाल्या. ‘एक्स’ वर पोस्ट करताना माजी मुख्यमंत्री मायावती म्हणाल्या, हल्दवानीतील घटना रोखता आली असती आणि मालमत्ता आणि जीवितहानी टळली असती.

या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करायला हवी आणि संवेदनशील भागात शांतता प्रस्थापित करायला हवी, असे त्या म्हणाल्या. बरेलीतील स्थिती तणावपूर्ण असून सरकारने तेथे अधिक सजगता बाळगणे आवश्‍यक आहे, असेही त्या म्हणाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com