पाटीदार समाजाने आरक्षणासाठी एकत्र लढावे- हार्दिक पटेल

वृत्तसंस्था
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

अहमदाबादः आरक्षणासाठीचे आंदोलन यापुढेही सुरू राहील आणि पाटीदार समाजाने एकत्रितपणे त्यासाठी लढा द्यायला हवा, असे आवाहन पाटीदार अनामत आंदोलन समितीचे समन्वयक हार्दिक पटेल यांनी आज (सोमवार) केले. दीड वर्षांनंतर आज प्रथमच आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते.

अहमदाबादः आरक्षणासाठीचे आंदोलन यापुढेही सुरू राहील आणि पाटीदार समाजाने एकत्रितपणे त्यासाठी लढा द्यायला हवा, असे आवाहन पाटीदार अनामत आंदोलन समितीचे समन्वयक हार्दिक पटेल यांनी आज (सोमवार) केले. दीड वर्षांनंतर आज प्रथमच आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते.

पटेल म्हणाले, "आपल्या समाजात दुही पडत आहे. आरक्षणाचे आंदोलन बळकट करण्यासाठी आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे. आपल्या माणसांवर झालेले हल्ले आपण विसरता कामा नये. गेल्या 18 महिन्यांत सत्ताधारी पक्ष आपले आंदोलन चिरडून टाकण्याचा वारंवार प्रयत्न करीत आहे. आपल्याविरोधात राजद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत; पण आपण आंदोलन थांबविणार नसून, तर ते सुरूच राहील. कोणीही आंदोलन थांबवू शकत नाही.'' आरक्षणाचा लाभ समाजाच्या पुढील पिढीला होणार असून, त्यांच्यासाठीच हे आंदोलन आहे, असेही त्यांनी सांगितले.

पाटीदार समाजाच्या आरक्षणावरून हार्दिक पटेल यांनी दोन वर्षांपूर्वी गुजरातमध्ये रान उठविले होते. 25 ऑगस्ट 2015 रोजी हार्दिक यांची पहिली मोठी सभा अहमदाबादेत झाली होती. त्यानंतर त्यांना ताब्यात घेतल्यानंतर राज्यातील विविध भागांत हिंसाचाराचे लोण पसरले होते. पोलिसांच्या संघर्षात दहा युवक ठार झाले होते. त्यानंतर पटेल यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. गुजरात उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी 15 जुलै रोजी त्यांची जामिनावर सुटका केली. तसेच सहा महिन्यांसाठी राज्यात प्रवेशबंदी करण्यात आली होती.

'केशुभाई पटेल यांच्याकडे दुर्लक्ष'
"पाटीदार समाजातील नेते व गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांना आपण योग्य सन्मान दिला नाही,'' याची आठवण हार्दिक पटेल यांनी या सभेत करून दिली. केशुभाई यांच्या कालखंडात गुजरातवर 36 हजार कोटी रुपयांचे कर्ज होते. आता हा बोजा तीन लाख कोटी रुपयांवर गेला आहे. हा कोणत्या प्रकारचा विकास आहे?, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. राज्याच्या विकासासाठी केशुभाई पटेल यांनी अनेक योजना सुरू केल्या; पण आपल्या समाजाकडून त्यांना पुरेसा आदर दाखविला गेला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Hardik Patel speaks in Ahmedabad after 1.5 years