'कडुनिंबाच्या झाडाखाली अभ्यास करणारे हरिवंश', राज्यसभेच्या उपसभापतीपदी निवडीनंतर मोदींनी केलं अभिनंदन

rajyasabha deputy speaker
rajyasabha deputy speaker

नवी दिल्ली - राज्यसभेच्या उपसभापतीपदी सत्तारुढ भाजप आघाडीचे उमेदवार व संयुक्त जनता दलाचे हरिवंश नारायण सिंह उर्फ हरिवंश यांची आज अपेक्षेनुसार फेरनिवड झाली. कॉंग्रेस आघाडीतर्फे (यूपीए) हरिवंश यांच्या बिहारचेच असलेले राजद उमेदवार प्रा. मनोज झा हे विरोधी उमेदवार होते. कोरोनामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे झा यांच्यासह यूपीएने मतविभाजनचा आग्रह धरला नाही. त्यामुळे सभापती वेंकय्या नायडू यांनी आवाजी मतदानानंतरच हरिवंश यांच्या उपसभापती निवडीची घोषणा केली. दोन्ही सभागृहे व गॅलऱ्यांमध्येही खासदार बसले असल्याने मतविभाजन घेण्यात आले नाही.

हरिवंश यांची फेरनिवड त्यांच्या सर्व पक्षांतील स्नेहाची पावती असल्याचे सभापती नायडू म्हणाले. "जीवनात असे प्रसंग येतात तेव्हा शब्दही असमर्थ व नि:शब्द होतात त्यापैकीच आजचा क्षण आहे,' अशी भावना 64 वर्षीय हरिवंश यांनी व्यक्त केली. ज्याप्रमाणे हरी हा सर्वांचा असतो, त्याप्रमाणेच हरिवंश वरिष्ठ सभागृहातील सर्व पक्षांना पुन्हा समान न्याय देतील' असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.  सक्रिय राजकारणात आले तरी त्यांच्यातील पत्रकार, लेखक सदैव जागा असलचेही त्यांनी सांगितले. झा यांनी ही दोन व्यक्तींमधील निवडणूक नव्हतीच, असे सांगितले. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी, सभापती वेंकय्या नायडू व हरिवंश यांची "दो हंसो की जोडी' असल्यानेच राज्यसभेची गाडी सुरळीत चालली, अशी कोटी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी : यंदा अत्यंत विषम व ऐतिहासिक परिस्थितीत सभागृहाची बैठक होत आहे. जयप्रकाश नारायण यांच्या सिताब्दियारा गावात जन्मलेले व विद्यार्थीदशेत गावाबाहेरील कडुनिंबाच्या झाडाखाली बसून अभ्यास करणारे हरिवंश यांनी सामाजिक कामे व पत्रकारितेच्या जगात एक वेगळी ओळख निर्माण केली.

गुलाम नबी आझाद : पहिल्या कार्यकाळातील अत्यंत कमी वेळात हरिवंश यांनी सर्व पक्षांच्या प्रतीनिधींबरोबर न्याय करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. ते आताही उजव्या, डाव्या व मधल्या बाकांवरील खासदारांनाही न्याय देतील. आम्ही (कॉंग्रेस सदस्य) ‘लेप्टिस्ट ऑफ द सेंटर' आहोत व हरिवंश आम्हालाही समान संधी देतील, असा विश्‍वास मला वाटतो.

वंदना चव्हाण: जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया व माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचा सहवास लाभलेले हरिवंश यांची विनम्रता उल्लेखनीय आहे.

सभागृह नेते गेहलोत यांच्यासह शिवसेनेचे संजय राऊत, बसपाचे सतीश मिश्रा, आपचे संजय सिंह, तृणमूल कॉंग्रेसचे डेरेक ओब्रायन, बिजू जनता दलाचे प्रसन्न आचार्य, टीआरएसचे के. केशव राव, वायएसआर कॉंग्रेसचे विजय साई रेड्डी, द्रमुकचे तिरूची सिवा, जदयूचे रामचंद्र प्रसादसिंह, माकपचे एलमारम करीम आदींनीही भावना व्यक्त केल्या. हरिवंश यांच्या नावाचा प्रस्ताव भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी मांडला. त्याला सभागृहनेते थावरचंद गेहलोत यांनी त्याला अनुमोदन दिले.

उपसभापती पॅनलमध्ये वंदना चव्हाण
राज्यसभेच्या उपसभापतींच्या पथकाचीही आज फेररचना करण्यात आली आहे. यात राष्ट्रवादीच्या चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे. याशिवाय भुवनेश्‍वर कलिता, सुखेंदू शेखर रॉय, सुरेंद्रसिंह नागर, डॉ. एल हनमंतय्या, डॉ. सस्मित पात्रा यांचीही उपसभापती पॅनलमध्ये नियुक्ती झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com