
प्लेग आणि लोकमान्यांची लोकनीती
सध्या आपण कोरोनाच्या संसर्गाला तोंड देत आहोत. सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वीदेखील प्लेगच्या साथीने पुण्यात थैमान घातले होते. या संकटाच्या काळात लोकमान्यांनी व्यापक प्रमाणात जनजागृती केली. लोकमान्यांची आज (ता. १ ऑगस्ट) १०१ वी पुण्यतिथी. त्यानिमित्त त्यांच्या कार्याला दिलेला उजाळा.
आपला देश कोरोनारुपी भस्मासुराचा सामना करीत असताना, आजपासून १२५ वर्षांपूर्वी महाराष्ट्राला, त्यातही पुण्याला मुख्यत्वे ग्रासणाऱ्या प्लेगचे स्मरण होते. तिचे प्रभावक्षेत्र जरी कोरोनापेक्षा मर्यादित असले, तरीही तेव्हाची समाजस्थिती, आरोग्यव्यवस्था आदींचा आढावा घेता त्याही संकटाची दुर्धरता आकळू शकेल. प्लेगचा मुकाबला करण्यासाठी तिच्या विस्फोटापूर्वी, उद्रेकाच्या काळात लोकमान्य टिळकांनी केलेले, सहसा अनभिज्ञ असलेले कार्य समजावे म्हणून हा लेखनप्रपंच.
कोरोनाचा विषाणू आज जसा चीनमधून उद्भवला आहे, तद्वतच प्लेगही चीनमधूनच उद्भवलेला असावा, हा काव्यागत न्याय! हाँगकाँग येथे प्लेगची साथ १८९४ पासून सलग ३ वर्षी उसळी मारून आली होती. सर्वप्रथम मुंबईत ही साथ आली. त्यानंतर पुण्यात तिचा फैलाव झाला. ऑक्टोबर १८९६ मध्ये पुण्यात प्लेगचा पहिला रुग्ण आढळला. सैनिकांकडून घरोघर तपासणीस १३ मार्च १८९७ या दिवशी सुरुवात झाली. प्लेग काळात जनजीवन विस्कळीत झालेच, पण जीवितहानीही झाली. त्याचसोबत सोजिरांकडून झालेल्या अत्याचारांची परिणती रॅंडसाहेबाच्या वधात झाली. हे सर्व टळावे, लोक अत्याचार, मृत्यूपासून वाचावेत यासाठी टिळकांनी सुरुवातीपासून लेखणी-कृतीची पराकाष्ठा केली.
हेही वाचा: गुजरातच्या मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट; बीडच्या तरुणाला अटक
प्लेगविस्फोटपूर्व जनजागृती
पुण्यात पहिला रुग्ण आढळण्याच्या संध्येलाच, टिळकांनी ६ आॅक्टोबर १८९६ रोजी अग्रलेख लिहून मार्गदर्शन केले. प्लेग हा मांडवी येथे मुख्यत्वे पसरण्यास तेथील अस्वच्छता कशी कारणीभूत आहे, याचे विवेचन करून प्लेगचे स्वरूप (त्यात रोग्यास येणारी गाठ आदी लक्षणे) वर्णून घरात, परिसरात स्वच्छता पाळल्यास प्लेगचे बव्हंशी निराकरण होऊ शकते, हे मांडले. पुढे पुण्यास काळ ठरलेल्या रॅंडसाहेबाचा (तेव्हाचा सातारचा असिस्टंट कलेक्टर) उल्लेख करून, ही नियुक्ती सरकारचा कडक अंमलबजावणी करण्याचा मानस दाखवीत असली, तरीही सरकारने सहभागात्मक दृष्टिकोन ठेवून लोकांना विश्वासात घ्यावे, धाकदपटशा न दाखवता सामोपचाराने कार्यवाही करावी, अशी सूचना केली.
उद्रेककालीन मार्गदर्शन
लोकमान्यांनी प्लेगसंदर्भातील ‘नवी योजना’ मांडताना, पुण्यात सर्व कारभार रॅंडसाहेबाच्या हातात एकवटला आहे, हे मांडून, लोकांनी फक्त सेग्रिगेशनवर न विसंबता आपली घरे कायमस्वरूपी (रुग्ण सेग्रिगेट झाला तरी) हवेशीर, स्वच्छ राखावीत अशी सूचना केली. त्यासोबतच, घरतपासणी होताना सोजिरांकडून गैरप्रकार, सामानाची चोरी झाल्यास, प्लेग कमिटीच्या मार्गदर्शनानुसार, घरातील कर्त्या पुरुषाने असे प्रकार वेळीच सोजिरांच्या वरिष्ठांना कळवले पाहिजे असे सांगितले.
कृतीशीलतेची जोड
आद्यकेसरीकारांनी केवळ कोरडा उपदेश न करता, गोऱ्या सोजिरांबरोबर घरतपासणीस उपस्थित राहून त्यांच्यातर्फे होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न केला. इतर नेत्यांना बरोबर घेऊन इस्पितळ काढण्यास हातभार लावला. गरिबांसाठी मोफत भोजनालय सुरू केले. टिळकांना लोकमान्यता मिळण्यास कारणीभूत ठरलेल्या समाजशरण व्यक्तित्वाचे हे ठसठशीत उदाहरण आहे, असे धनंजय कीर यांनी ‘लोकमान्य टिळक’ या पुस्तकात खुबीने मांडले. त्यांनी इंग्रजांकडून चालू असलेल्या गैरव्यवहारांविरुद्ध पुण्याच्या पेठांतून सभा घेतल्या. शुक्रवारातल्या काही सभांना नायकिणी उपस्थित असल्याचा संदर्भ मिळतो. टिळकांच्या सर्वस्पर्शी नेतृत्वाची ही साक्ष होय.
हेही वाचा: भाजप खासदार बाबूल सुप्रियो यांचा राजकारणाला 'अलविदा'
लसीकरण आणि प्रबोधन
आजच्या घडीचा सर्वात महत्त्वाचा आणि जीवनमरणाचा प्रश्न बनून राहिलेला विषय म्हणजे लसीकरण, त्याची उपयोगिता! १२५ वर्षांपूर्वी प्लेगच्या वेळेसही हा विषय तितकाच महत्त्वाचा होता. १८९९ मध्ये, डॉ. हाफकिन निर्मित सरकारी लस तयार झाली. त्याच्या निर्मितीत काही त्रुटी असल्याने, लोकांवर तिचा प्रतिकूल परिणाम झाल्याने लसीबाबत उदासीनता निर्माण झाली होती. या लसीबाबत जबरदस्ती सुरू झाली असता, लोकमान्यांनी लशीमागचा कार्यकारणभाव समजावून देणारा अग्रलेख लिहिला, त्याचे नाव ‘इनॉक्युलेशन-प्रकरण’. यातच, सरकारच्या वतीने प्रतिवाद करणाऱ्या डॉ. भाटवडेकर यांना अतिशय अभ्यासपूर्ण उत्तरे दिली आहेत. १४ पानांचा हा अग्रलेख, त्यातल्या अभ्यासपूर्णतेसाठी, युक्तिवादांसाठी मुळातून वाचण्यासारखा आहे. सरकारची जबाबदारी केवळ ‘लसीकरण केले’ येथवर संपत नाही, तर तत्पश्चात, तिच्यापासून काही अपाय नाही, हे पाहून इतर उपाययोजनाही कराव्यात, अशी मागणी टिळकांनी केली होती.
इतर उद्बोधन
प्लेग खर्चाचा जो भार सरकार म्युनिसिपाल्टीवर टाकत होते, तो पर्यायाने आधीच पिचलेल्या लोकांकडून प्लेग टॅक्स लावून वसूल केला जाणार होता. याविरोधात, प्लेगकाळ संपत आलेला असताना दूरदृष्टीने टिळकांनी आवाज उठवला. लसीकरणातील सांख्यिकीय माहितीबाबत, प्लेग-कमिशनने त्रुटी दाखवल्या असता, टिळकांनी ‘केसरी’मध्ये याकडे लक्ष वेधून कमिशनची सविस्तर टेबल दिली. हा त्यांच्या पत्रकारितेचा महत्त्वाचा पैलू आहे. टिळकांनी प्लेग काळात केलेल्या कार्याचा अभ्यास करताना, त्यांची अभ्यासू वृत्ती, लोकहिताची तळमळ याचे दर्शन घडते. त्या काळातले १५ अग्रलेख (पाहा, समग्र टिळक - खंड ४) हा अप्रतिम अभ्यासाचा नमुना आहे. त्यात त्यांनी प्लेग काळातील श्रद्धा, परंपरांचे योग्य नियोजन, मजुरांचे स्थलांतर याहीवर भाष्य केले आहे. त्यांनी लोकांमध्ये मिळून मिसळून केलेले कार्य हा नेत्यांसाठी वस्तुपाठ आहे. आज आपण अशाच परिस्थितीतून मार्गक्रमणा करीत असताना, ते कार्य आदर्श ठेवून सद्यव्यवस्थेतील त्रुटी दूर करणे हीच त्यांना पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली ठरेल.
- हर्ष जोशी
Web Title: Harsh Joshi Writes About Lokmanya Tilak
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..