'डेरा'च्या मुख्यालयात फटाक्‍यांचा अवैध कारखाना

वृत्तसंस्था
रविवार, 10 सप्टेंबर 2017

शोधमोहिमेचा दुसरा दिवस; साध्वींच्या निवासापर्यंत गुप्त मार्ग

सिरसा: "डेरा सच्चा सौदा'च्या मुख्यालयात सुरू असलेल्या शोधमोहिमेचा आज दुसरा दिवस असून, येथे फटाक्‍यांची निर्मिती करणारा एक अवैध कारखाना सुरू असल्याची बाब समोर आली आहे. सुरक्षा यंत्रणेने डेराप्रमुख गुरमीत रामरहीम सिंग याच्या गुहेपासून साध्वींच्या वसतिगृहापर्यंत जाणारा एक गुप्त मार्गही शोधून काढला आहे.

पंजाब-हरियाना उच्च न्यायालयाने डेरा मुख्यालयाची झाडाझडती घेण्याचे आदेश दिल्यानंतर काल (ता. 8) निवृत्त न्यायाधीश ए. के. एस. पवार यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. आज राबविलेल्या शोधमोहिमेत फटाके तयार करण्याचा कारखाना व त्यासाठी लागणारी रसायने आढळून आली. गुरमीत रहात असलेल्या गुहेपासून साध्वी निवासपर्यंत निघणारा एक गुप्त मार्ग तसेच, एक कृत्रीम बोगदाही सुरक्षा यंत्रणेने शोधून काढल्याची माहिती हरियाना माहिती व जनसंपर्क विभागाचे उपसंचालक सतीश मेहरा यांनी दिली.

हा कारखाना अवैध असल्याचे सांगतानाच त्याचा वापर स्फोटके तयार करण्यासाठी होत असल्याची शक्‍यताही मेहरा यांनी व्यक्त केली. मुख्यालयात एका ठिकाणी "एके-47' बंदुकीच्या गोळ्यांचे काही रिकामे बॉक्‍सही आढळून आल्याचेही मेहरा यांनी सांगितले.

दरम्यान, कारवाईच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेली संचारबंदी कायम असून, डेराच्या मुख्यालयाकडे जाणारे रस्ते वाहतुकीसाठी अद्याप बंद ठेवण्यात आले आहेत.

चामकौर, दान सिंगला अटक
चंडीगड ः "डेरा'प्रमुख गुरमीतला न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर हिंसा भडकविण्यास कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून चामकौर सिंग व दान सिंग या दोघांना चंडीगड येथून अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. चामकौर हा डेराच्या पंचकुला केंद्राचा प्रमुख असून, दान सिंग हाही मुख्य पदाधिकाऱ्यांपैकी एक आहे. दरम्यान, गुरमीतचा अंगरक्षक व पोलिस कमांडो असलेल्या करमजीत सिंग यालाही पोलिसांनी अटक केली आहे. पंचकुलातील न्यायालयाच्या आवारातून गुरमीतची सुटका करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यात करमजीतचा हात असल्याचा संशय पोलिसांना आहे.

Web Title: haryana news 'Dera' headquarters Fireworks illegal factory