Hathras : मुलीनेच मुलाला बोलावलं असेल; मात्र मुलेच का दोषी? भाजप नेत्याचे धक्कादायक विधान

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 7 October 2020

या प्रकरणातील मुले निर्दोष आहेत, त्यांना वेळेत सोडलं गेलं नाही तर मानसिक त्रासाल सामोरे जावे लागेल. त्यांचं वय गेलं तर परत कोण करणार ते?

हाथरस येथे घडलेले सामुहिक बलात्काराचे प्रकरण देशभर संतापाची लाट उसळण्यास कारणीभूत ठरले. या घटनेतील पीडितेला न्याय मिळावा म्हणून देशभरात लोक रस्त्यावर आले. या प्रकारच्या घटना देशात घडणे ही लाजिरवाणी बाब असल्याची भावना सार्वत्रिक आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशातील भाजपाचे आमदार आणि खासदार याबाबत आक्षेपार्ह विधाने करत असल्याचे दिसून आले आहे. आता पुन्हा एका भाजपा नेत्याने या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बलात्कारबाबत मुक्ताफळे उधळली आहेत. मुलीनेच मुलाला शेतामध्ये बोलावलं असेल. बहुतांश वेळेला असंच होतं. त्यातही पकडली गेली असेल. मात्र, नेहमी मुलेच दोषी, मुली नाही. असं कसं? असं धक्कादायक विधान या नेत्यानं केलं आहे. 

हेही वाचा - जगातील ५८ टक्के महिला ऑनलाइन छळाच्या बळी

उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील भाजप पक्षाचे नेते रणजीत बहादूर श्रीवास्तव यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांचं हे वक्तव्य एका व्हीडिओच्या माध्यमातून सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या हाथरस प्रकरणात मुलीचेच मुलाशी प्रेमप्रकरण असेल आणि तिनेच त्याला शेतात बोलावलं असेल, असा धक्कादायक दावा या नेत्याने केला आहे. बलात्काराच्या घटनेत बहुतांश वेळेला असंच होतं, मी काही चुकीचं बोलत नाहीये, अशी पुष्टीही त्यांनी जोडली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड उठत आहे. 

मुलीनंच मुलाला बाजरीच्या शेतात बोलावलं असेल, कारण त्यांच्यात प्रेमप्रकरण असेल. ही गोष्ट सोशल मीडिया, चॅनेलवरही आली आहे. बहुतेकदा शेतामध्ये हेच होतं. ज्या मुली याप्रकारे मरतात, त्या अशाच काही ठिकाणी सापडतात. उसाच्या शेतात, तुरीच्या शेतात, बाजरीच्या शेतात, नाल्यामध्ये, जंगलामध्ये सापडतात. तांदळाच्या शेतात का नाहीत सापडत? गव्हाच्या शेतात मेलेल्या का आढळत नाहीत? यांच्या मरणाची जागा हीच आहे. त्या कुठेही ओढून नेल्या जात नसतात. ओढून नेलं जात असताना त्यांना कुणी पाहतही नाही मग यांच्यासोबतच असं का घडतं? हे देशपातळीवर सगळ्यांना माहितीय. मी काहीही चुकीचं बोलत नाहीये. पण असं असताना मुलगी दोषी नाही, आणि मुले मात्र दोषी! असं एकूण वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आहे. 

हेही वाचा - hathras case: ''दलित मुलीचा बलात्कारानंतर खून होतो, पण मोदींचा एकही शब्द नाही''

या प्रकरणातील मुले निर्दोष आहेत, त्यांना वेळेत सोडलं गेलं नाही तर मानसिक त्रासाल सामोरे जावे लागेल. त्यांचं वय गेलं तर परत कोण करणर ते? सरकार नुकसानभरपाई देणार आहे का? सीबीआय आरोपपत्र दाखल करेपर्यंत त्यांना तुरुंगातून सोडण्यात यावं, अशी मागणीही त्यांनी केली आहे. 
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांना या वक्तव्याबाबत नोटीस पाठवणार असल्याचं म्हटलं आहे. मात्र, त्यांना कोणत्याही पक्षाचा नेता संबोधने योग्य नाही, ते त्यांची आजारी आणि जूनाट मानसिकता दाखवत आहेत, असंही त्या म्हणाल्या.
या  प्रकराच्या वक्तव्यावर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी सोशल मीडियावर होत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hathras case ranjeet shriwastav controversial remark hathras victim