hathras case:पीडितेच्या कुटुंबीयांना तिहेरी सुरक्षा कवच; घराभोवती सीसीटीव्ही कॅमेरे

hathras
hathras

नवी दिल्ली- उत्तरप्रदेशातील दलित तरुणीवरील सामूहिक बलात्कार आणि खूनप्रकरणी राज्य सरकारने आज सर्वोच्च न्यायालयामध्ये शपथपत्र सादर करत पीडितेचे कुटुंबीय आणि साक्षीदारांना तिहेरी सुरक्षा कवच पुरविल्याचा दावा केला आहे. या सर्वांना सुरक्षा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, या प्रकरणाची पारदर्शक आणि मुक्त वातावरणामध्ये चौकशी होईल, असेही शपथपत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.

सीबीआयने या प्रकरणाच्या चौकशीचा स्थिती अहवाल हा पंधरा दिवसांमध्ये सादर करावा म्हणून न्यायालयाने त्यांना तसे आदेश द्यावेत कारण तोच पुढे उत्तरप्रदेशच्या पोलिस महासंचालकांना न्यायालयामध्ये सादर करता येईल, असे शपथपत्रामध्ये सांगण्यात आले आहे. पीडितेच्या गावाच्या प्रवेशद्वारावरच चोवीस तास आठ सैनिकांचा पहारा असेल तसेच प्रत्यक्ष पीडितेच्या घराबाहेर देखील दोन पूर्णवेळ पोलिस अधिकाऱ्यांना तैनात केले जाणार आहे, असेही यामध्ये नमूद करण्यात आले आहे. उत्तरप्रदेशच्या गृहविभागाच्या विशेष सचिवांनी सर्वोच्च न्यायालयात हे शपथपत्र सादर केले आहे. पीडितेच्या घराभोवती सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसविण्यात आले आहेत. या भागातील पोलिस निरीक्षक हे दररोज पीडितेच्या घराला भेट देऊन सुरक्षेचा आढावा घेतील, असे राज्य सरकारने म्हटले आहे.

अमृता फडणवीसांच्या 'Dicey Creature'ला रुपाली चाकणकरांचं प्रत्युत्तर;...

खासगी वकील नेमले

पीडितेच्या कुटुंबीयांना त्यांची बाजू मांडण्यासाठी वकील उपलब्ध करून देण्यात आले आहेत का, असा सवाल आजच्या सुनावणीवेळी न्यायालयाने केला असता यूपी सरकारने सीमा कुशवाह आणि राज रतन या दोन खासगी वकिलांना यासाठी नेमण्यात आल्याचे स्पष्ट केले.

कारवाईची मागणी करणारी याचिका

हाथरसप्रकरण हाताळताना निष्काळजीपणा करणारे पोलिस अधिकारी, रुग्णालयाचे कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी आणि अन्य सरकारी अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली आहे. या सर्वांवर विविध कलमांबरोबरच अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये देखील कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते चेतन जनार्दन कांबळे यांनी केली आहे.

वडील भावाची पुन्हा चौकशी
सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी आज पुन्हा पीडितेचे वडील आणि तिच्या भावाची चौकशी करत त्यांच्याकडून नव्याने माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. पीडितेच्या कुटुंबातील महिला सदस्यांची देखील सीबीआय चौकशी करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. तत्पूर्वी मंगळवारी सीबीआयच्या पथकाने प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट देत पाहणी केली होती.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com