आणखी एका 'निर्भया'ची झुंज अपयशी; सामूहिक बलात्कारानंतर नराधमांनी कापली होती जीभ

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 29 September 2020

उत्तर प्रदेशातील हाथरस इथं सामूहिक बलात्कार झालेल्या पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. बलात्कार करणाऱ्या नराधमांनी पीडितेची जीभ कापली होती. याशिवाय जबर मारहाण केली होती.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील हाथरस इथं सामूहिक बलात्कार झालेल्या पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. बलात्कार करणाऱ्या नराधमांनी पीडितेची जीभ कापली होती. याशिवाय जबर मारहाण केली होती. यात तिच्या पाठीचे हाडही मोडले होते. गेल्या आठवड्याभरापासून ती सफदरजंग रुग्णालयात मृत्यूशी लढा देत होती. मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास तिने अखेरचा श्वास घेतला. 

वैद्यकीय चाचणीमध्ये अशी माहिती समोर आली की, नराधमांनी बलात्कारानंतर पीडितेच्या पाठीचे हाड मोडले होते. पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केला होता. 21 सप्टेंबरला पीडित तरुणी शुद्धीवर आल्यानंतर करण्यात आलेल्या वैदकीय चाचणीच्या अहवालात सामूहिक बलात्कार केला असल्याचं स्पष्ट झालं. पीडित तरुणीने असंही सांगितलं की,  तिने लोकांना हा प्रकार सांगू नये आरोपींनी तिची जीभही कापली.

हाथरसमधील चंदपा भागात असलेल्या गावात 14 सप्टेंबरला चार तरुणांनी 19 वर्षीय तरुणीवर शेतात नेऊन बलात्कार केला होता. या प्रकरणी पोलिसांवर बेजबाबदारपणाचा आरोपही पीडितेच्या कुटुंबियांनी केला. बलात्काराचा गुन्हा नोंद न करता पोलिसांनी छेडछाडीच्या गुन्ह्याखाली तरुणाला ताब्यात घेतलं आणि त्यानंतर आरोपीविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुनहा दाखल केला होता.

हे वाचा - केंद्र सरकारने ऑफसेट पॉलिसी केली रद्द; कॅगच्या अहवालानंतर संरक्षण मंत्रालयाचा निर्णय

घटनेच्या 9 दिवसांनी पीडित तरुणी शुद्धीवर आली होती. तेव्हा तिने कुटुंबियांना सर्व प्रकार सांगितला. पीडितेची वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर सामूहिक बलात्कार झाल्याचं समोर आलं. या प्रकरणी हाथरस पोलिसांनी तीन तरुणांना अटक केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hathras gang-rape victim died she was admitted in Safdarjung