Hathras - अखेर स्मृती इराणींनी सोडलं मौन, राहुल गांधींवर केली टीका

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 3 October 2020

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या प्रकरणाला न्याय देतील असा विश्वास स्मृती इराणी यांनी व्यक्त केला आहे.

वाराणसी- हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अखेर मौन सोडलं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या प्रकरणाला न्याय देतील असा त्यांना विश्वास आहे. त्याचबरोबर त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला असून हाथरसला राहुल गांधी केवळ राजकारणासाठी जात असल्याचा आरोप त्यांनी केला. 

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणी महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्या मौनावर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले होते. यूपीए सरकारच्या काळात महिला अत्याचारापासून ते महागाईपर्यंतच्या प्रत्येक मुद्द्यावर त्यांना धारेवर धरणाऱ्या स्मृती इराणी यांनी हाथरस प्रकरणी मौन का बाळगले आहे, असा सवाल देशभरातील विरोधी पक्षांनी केला होता. त्याचदरम्यान स्मृती इराणी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आणि राहुल गांधी यांच्यावर टीका ही केली. 

हे वाचा - सुशांतची हत्या नव्हे तर आत्महत्याच, एम्सने CBI कडे पाठवला अहवाल

स्मृती इराणी पुढे म्हणाल्या, राहुल गांधी प्रत्येक गोष्टीचे राजकारण करण्याच्या प्रयत्नात असतात. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रनीतीमध्ये यशस्वी झाले आहेत. मला वाटतं की, देशातील जनतेला काँग्रेसचे हे डावपेच चांगलेच समजले आहेत. कोणताही नेता कोणत्याही विषयाचे राजकारण करु इच्छितो, त्याला मी रोखू शकत नाही. परंतु, जनतेला माहीत आहे की, राहुल गांधी हे हाथरसला पीडितेला न्याय देण्यासाठी जात नसून राजकारणासाठी जात आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hathras union minister smriti irani slams on rahul gandhi