आरोग्य, शिक्षण करमुक्त

पीटीआय
शनिवार, 20 मे 2017

दूरसंचार आणि वित्तीय सेवांसाठी 18 टक्के कर आकारण्यात येईल. वाहतूक सेवेवर 5 टक्के असेल. ओला आणि उबर यांसारख्या ऑनलाइन प्रवासी टॅक्‍सी कंपन्या सध्या 6 टक्के कर भरतात. विनावातानुकूलित रेल्वे प्रवासाला करसवलत देण्यात आली असून, वातानुकूलित रेल्वे प्रवासावर 5 टक्के कर असेल

श्रीनगर - वस्तू व सेवाकर (जीएसटी) रचनेतून आरोग्यसुविधा आणि शिक्षण या सेवा वगळण्यात आल्या आहेत. "जीएसटी' परिषदेच्या बैठकीत शुक्रवारी सेवांची करनिश्‍चिती करण्यात आली. वस्तूंप्रमाणेच चारस्तरीय कररचना सेवांसाठी अंतिम करण्यात आली. जीएसटी परिषदेने सेवांसाठी 5, 12, 18, 28 टक्के चारस्तरीय रचना अंतिम केली. यात दूरसंचार विमा, हॉटेल आणि रेस्टॉरन्ट या महत्वाच्यया सेवांचे कर निश्‍चित करण्यात आले आहेत.

दोन दिवसीय परिषदेच्या समारोपानंतर आज पत्रकारांशी बोलताना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले, ""दूरसंचार आणि वित्तीय सेवांसाठी 18 टक्के कर आकारण्यात येईल. वाहतूक सेवेवर 5 टक्के असेल. ओला आणि उबर यांसारख्या ऑनलाइन प्रवासी टॅक्‍सी कंपन्या सध्या 6 टक्के कर भरतात. विनावातानुकूलित रेल्वे प्रवासाला करसवलत देण्यात आली असून, वातानुकूलित रेल्वे प्रवासावर 5 टक्के कर असेल. मेट्रो, लोकल आणि धार्मिक पर्यटनालाही "जीएसटी'तून सवलत देण्यात आली आहे.

इकॉनॉमी क्‍लासच्या विमान प्रवासावर पाच टक्के, तर बिझनेस क्‍लासच्या विमान प्रवासावर 12 टक्के कर आकारण्यात येईल. विनावातानुकूलित रेस्टॉरन्टमधील खाद्यपदार्थांच्या बिलावर 12 टक्के कर असेल. वातानुकूलित तसेच, मद्यपरवाना असलेल्या रेस्टॉरंटसाठी हा कर 18 टक्के असेल. पंचतारांकित हॉटेलांसाठी हा कर 28 टक्के असणार आहे. पन्नास लाख रुपयांपेक्षा कमी उलाढाल असलेल्या रेस्टॉरंटसाठी 5 टक्के कर असेल. लॉंड्रीसारख्या कामांसाठी 12 टक्के कर असणार आहे.

प्रतिदिन दररोज एक हजार रुपयांपर्यंत भाडे आकारणाऱ्या हॉटेल आणि लॉजेसला जीएसटीतून वगळण्यात आले आहे. प्रतिदिन एक ते दोन हजार रुपये भाडे आकारणाऱ्या हॉटेल आणि लॉजेससाठी 12 टक्के कर असेल. याचवेळी अडीच ते पाच हजार रुपये भाडे आकारणाऱ्या हॉटेलांना 18 टक्के कर आकारण्यात येईल. पाच हजार रुपयांपेक्षा अधिक भाडे आकारणाऱ्या हॉटेलांवर 28 टक्के कर असेल. लॉटरीवर कर असणार नाही. फ्लिपकार्ट, स्नॅपडिल यासारख्या ई-कॉमर्स कंपन्या वितरकाला पैसे देताना एक टक्का उद्गम कर कपात करतील, असे सूत्रांनी सांगितले.

सोन्यासाठी 3 जूनला बैठक
"जीएसटी' रचनेतील वस्तूंचे कर काल (गुरुवारी) निश्‍चित करण्यात आले होते. मात्र, सोन्यासह काही मौल्यवान वस्तूंचे दर अद्याप निश्‍चित होऊ न शकल्याने त्यावर "जीएसटी'ची 1 जुलैला अंमलबजावणी होण्यापूर्वी निर्णय होईल. यासाठी जीएसटी परिषदेच्या बैठक 3 जूनला पुन्हा होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Health, Education tax free