करूणानिधी यांची प्रकृती नाजूक

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

''करुणानिधी यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. ते वैद्यकीय यंत्रणेवर आहेत. त्यांना रक्तदाब जाणवू लागल्याने 28 जुलैला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सध्या त्यांचा रक्तदाब नियंत्रणात आहे. मात्र, प्रकृती खालावली आहे''.

- डॉ. अरविंद सेल्वाराज, कार्यकारी संचालक, कावेरी रुग्णालय

नवी दिल्ली : द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांची प्रकृती आणखी खालावली असून, त्यांच्याकडून उपचारांना योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले. तसेच त्यांचे वय जास्त असल्याने त्यांचे शरीर कोणत्याही उपचारांना साथ देत नाही, असेही येथील डॉक्टरांनी सांगितले.

चेन्नईच्या कावेरी रुग्णालयात गेल्या दहा दिवसांपासून करुणानिधी उपचार घेत आहेत. त्यांच्यावर कावेरी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार केले जात आहेत. मात्र, त्यांची प्रकृती आज आणखीच नाजूक असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. याबाबत कावेरी रुग्णालय प्रशासनाने सांगितले, की ''द्रमुक अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री एम. करूणानिधी यांची तब्येत नाजूक आहे. त्यांचे वय जास्त असल्याने शरीरातील महत्वाचे अवयव काम करण्यास कमजोर होत आहे''.  

याबाबत रुग्णालयाचे कार्यकारी संचालक अरविंद सेल्वाराज यांनी सांगितले, की ''करुणानिधी यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. ते वैद्यकीय यंत्रणेवर आहेत. त्यांना रक्तदाब जाणवू लागल्याने 28 जुलैला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सध्या त्यांचा रक्तदाब नियंत्रणात आहे. मात्र, प्रकृती खालावली आहे'', असे सेल्वाराज यांनी सांगितले.  

दरम्यान, 94 वर्षीय करुणानिधी यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अन्य काही नेत्यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही त्यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी करुणानिधी यांच्यासह द्रमुकचे कार्यकारी अध्यक्ष आणि करुणानिधी यांचे पुत्र एम. के. स्टॅलिन आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. 

Web Title: the health of Kunanidhi is critical