आनंदाची बातमी! कोविड-19 लशीसंबंधी आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 13 October 2020

कोरोना महामारीमुळे (corona virus) अभूतपूर्व आणि असामान्य अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

नवी दिल्ली-  कोरोना महामारीमुळे (corona virus) अभूतपूर्व आणि असामान्य अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीतून आपण हळूहळू बाहेर येत आहोत. पण, कोरोना रुग्णांची संख्या वाढतानाच दिसत आहे. अशा परिस्थितीत कोरोनावरील प्रभावी लस (corona vaccine) केव्हा येईल, असा प्रश्न अनेकांना सतावत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Dr HarshVardhan) यांनी यावर भाष्य केले आहे. कोविड विषाणूवर प्रभावी ठरणारी लस 2021 च्या सुरुवातीला मिळण्याची शक्यता असल्याचं ते म्हणाले आहेत. तसेच, लस एकापेक्षा अधिक स्त्रोतांपासून मिळू शकते, असंही हर्षवर्धन म्हणाले आहेत. 

पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला लस मिळण्याची शक्यता आहे. शिवाय आपल्या देशाला एक किंवा त्यापेक्षा अधिक स्त्रोतांपासून कोरोनावरील लस मिळू शकते. कोरोनावरील लस कोणाकडून सर्वात आधी मिळू शकेल, याबाबत आपला तज्ज्ञ गट माहिती घेत आहे. त्या दिशेने प्रयत्न केले जात असून कोल्ड चेन सुविधाही मजबूत केली जात आहे, असं हर्षवर्धन म्हणाले आहेत. यापूर्वी आरोग्य मंत्र्यांनी कोरोनावरील लस 2021 च्या सुरुवातीच्या तीन महिन्यात उपलब्ध होईल, असं म्हटलं होतं. 

मला लग्नचं नाही करायचं, कुणाला काही प्रॉब्लेम ?; सलमानचा बिग बॉसमधल्या...

भारताची प्रचंड लोकसंख्या लक्षात घेता, एक लस निर्माता कंपनी आपली कोरोना लशीची मागणी पूर्ण करु शकत नाही. त्यामुळे आपण अनेक कोविड लस निर्मात्या कंपन्यांशी संपर्क साधून आहोत. भारताच्या सर्व लोकसंख्येला कोविडचा डोस मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले आहेत. भारतात सध्या चार उमेदवार लस निर्मितीच्या वैद्यकीय टप्प्यात आहेत. 

अमेरिकेनंतर भारत हा कोरोना महामारीने सर्वाधिक प्रभावित दुसरे राष्ट्र आहे. भारतात काही दिवसांपूर्वी 90 हजारांच्या पुढे कोरोनाबाधित रुग्ण सापडत होते. पण गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सोमवारी देशात 60 हजारांपेक्षा कमी कोरोना रुग्ण सापडले आहेत. देशात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 71,75,800 झाली आहे. समाधानाची बाब म्हणजे देशात कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या 62 लाखांच्या पुढे गेली आहे. देशात सध्या 10 लाखांपेक्षा कमी कोरोनाग्रस्त रुग्ण उपचार घेत आहेत. 

(edited by- kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: health minister Dr HarshVardhan big comment on corona vaccine