
भारताने अलिकडेच जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ऑक्सफर्डच्या कोविशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लशीला मंजूरी दिली आहे.
नवी दिल्ली : कोरोनाच्या आणखी चार लसी सध्या मंजूरीच्या वाटेवर असून या लसी निर्मिती करणाऱ्या कंपन्या ड्रग्ज कंट्रोलरकडे जाऊ शकतात, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने काल मंगळवारी दिली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भुषण यांनी म्हटलं की, झायडस कॅडिला, स्फुटनिक-व्ही, बायोलॉजिकल ई आणि जेनोव्हा (Zydus Cadila, Sputnik V, Biological E and Gennova) या चार लशी सध्या क्लिनिकल चाचण्यांच्या प्रक्रियेत आहेत.
भुषण यांनी पुढे म्हटलं की, येत्या काही दिवसांत या लसीसुद्धा ड्रग्ज कंट्रोलरकडे आपत्कालीन वापराच्या मंजूरीसाठी जाऊ शकतात. झायडस कॅडिला या लसीने गेल्या डिसेंबरमध्ये 2 क्लिनिकल ट्रायल पूर्ण केल्या आहेत. तसेच तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलसाठी मंजूरी मिळवली आहे. अगदी तसेच, रशियाच्या स्फुटनिक-व्ही या कोरोनावरील लशीची दुसऱ्या टप्प्यातील ट्रायल पूर्ण झाली आहे आणि तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल भारतातील सहयोगी कंपनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजकडून पार पाडली जात आहे.
हेही वाचा - कोरोनाविरुद्ध अंतिम लढा सुरू
बायोलॉजिकल ई या लशीच्या पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल डिसेंबरमध्ये सुरु झाली आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील चाचणी मार्चमध्ये सुरु होईल, अशी शक्यता आहे. जेनोव्हा लस सध्या पहिल्या टप्प्यातील ट्रायलमध्ये असून येत्या मार्चमध्ये दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरु होण्याच्या शक्यता आहेत. पुढे भुषण यांनी म्हटलं की, मॉडर्नाच्या लसीचा एक खुराक 2,348 ते 2,715 रुपयांपर्यंत मिळेल. तर सिनोफार्मच्या लसीचा प्रत्येकी एक खुराक 5,650 रुपयांपर्यंत मिळेल. सिनोव्हॅक बायोटेक 1027 रुपयांपर्यंत मिळेल. नोनॅव्हॅक्स 1,114 रुपयांपर्यंत मिळेल. तर गेमालया सेंटरची लस 734 रुपयांपर्यंत मिळेल. जॉनसन एँड जॉनसनची लस 734 रुपयांपर्यंत मिळेल.
फायझर वगळता इतर सर्व लसी या 2 ते 8 डिग्री सेल्सियसला साठवता येतात. फायझर लस मात्र -70 डिग्री सेल्सियसवरच ठेवावी लागते. भारतात कोरोनाचे लसीकरण 16 जानेवारीपासून सुरु होणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात तीन कोटी आरोग्य कर्मचारी तसेच फ्रंटलाईन वर्कर्सना ही लस देण्यात येईल. भारताने अलिकडेच जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ऑक्सफर्डच्या कोविशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लशीला मंजूरी दिली आहे.