बुडीत कर्जे डोईजड

वृत्तसंस्था
शनिवार, 16 जून 2018

सरकारी बॅंकांनी आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये 1.20 लाख कोटी रुपयांची थकीत कर्जे बुडीत खात्यात जमा केली आहेत. सरकारी बॅंकांना मागील आर्थिक वर्षात झालेल्या एकूण तोट्याच्या तुलनेत हे प्रमाण तब्बल दीडपट आहे.

नवी दिल्ली: सरकारी बॅंकांनी आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये 1.20 लाख कोटी रुपयांची थकीत कर्जे बुडीत खात्यात जमा केली आहेत. सरकारी बॅंकांना मागील आर्थिक वर्षात झालेल्या एकूण तोट्याच्या तुलनेत हे प्रमाण तब्बल दीडपट आहे. 

आर्थिक वर्षात सरकारी बॅंकांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागण्यासोबत बुडीत कर्जांच्या समस्येलाही सामोरे जावे लागले. यामुळे आधीच अडचणीत आलेल्या सरकारी बॅंकांची स्थिती आणखी बिकट झाली आहे. दशकभरात प्रथमच बॅंकांनी मोठ्या प्रमाणात तोटा दाखविण्यासोबत एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्जे बुडीत खात्यात दाखविली आहेत. सरकारी बॅंकांना 2016-17 मध्ये नफा झाला होता. याउलट मागील आर्थिक वर्षात त्यांना 85 हजार 370 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये 21 सरकारी बॅंकांचे बुडीत कर्जे 81 हजार 683 कोटी रुपये होती. याच वर्षात त्यांचा एकूण नफा 473 कोटी रुपये होता. 

"एसबीआय'चा हिस्सा 25 टक्के 
वर्षातील बुडीत कर्जांमध्ये केवळ स्टेट बॅंक ऑफ इंडियाचा (एसबीआय) हिस्सा सुमारे 25 टक्के आहे. "एसबीआय'ने एकूण 40 हजार 196 कोटी रुपयांची थकीत कर्जे बुडीत खात्यात जमा केली. 

बुडीत कर्जे (2017-18) 
- स्टेट बॅंक ऑफ इंडिया : 40,196 
- कॅनरा बॅंक : 8,310 
- पंजाब नॅशनल बॅंक : 7,407 
- बॅंक ऑफ बडोदा : 4,948 

आर्थिक वर्ष : बुडीत कर्ज 
2013-14 : 34,409 
2014-15 : 49,018 
2015-16 : 57,585 
2016-17 : 81,683 
2017-18 : 1,20000 
(आकडे कोटी रुपयांमध्ये) 

Web Title: heavy bank loan