पूरग्रस्तांना दिल्लीतील मराठी बांधवांकडून भरघोस मदत

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 14 August 2019

कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, धुळेच्या अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती गंभीर आहे. म्हणून दिल्लीत स्थायिक झालेल्या मराठी बांधवांनी या पूरग्रस्तांना मदतीचा हात द्यावा, असे आवाहन करण्यात आले होते.

नवी दिल्ली : महाराष्ट्रावर कोसळलेल्या अस्मानी संकटांचा सामना करणाऱ्या पूरग्रस्त बांधवांसाठी दिल्लीतील विविध ही संस्था आणि मंडळे यांनी 25 लाख रुपयांची मदत केली असून ही मदत उद्या (ता 15) विशेष रेल्वेगाडीद्वारे पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे.

या मदतीमध्ये विविध उपयोगी साहित्य आणि 18 लाख रुपये रोख यांचा समावेश आहे. पुरग्रस्तांना मदतीचा हा पहिला टप्पा असून यापुढेही दिल्लीतून मदत जमा करण्याचे काम सुरू असेल, अशी माहिती दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे वैभव डांगे यांनी दिली.

कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, धुळेच्या अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती गंभीर आहे. म्हणून दिल्लीत स्थायिक झालेल्या मराठी बांधवांनी या पूरग्रस्तांना मदतीचा हात द्यावा, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर दिल्लीत पूरग्रस्तांसाठी मदत निधीची संकलन केंद्रे उघडण्यात आली. या मदत केंद्रांवर आज पर्यंत 25 लाखांचा मदतनिधी आणि साहित्य जमा झाले. यामध्ये 18 लाख रुपये, त्याचप्रमाणे कपडे, ब्लँकेट, औषधे, टिकाऊ अन्नपदार्थ आदी उपयोगी साहित्य आहे.

दिल्लीतल्या अनेक गणेश मंडळांनी यंदाच्या गणेशोत्सवातील खर्चात कपात करून तो मदत निधी पूरग्रस्तांसाठी दिल्याचे सांगण्यात आले. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या लोधी इस्टेट भागातील निवासस्थानी ही मदत एकत्रित करण्यात आली. उद्या सकाळी रेल्वेद्वारे ती महाराष्ट्रात पाठविण्यात येईल. यासाठी स्वतंत्र बोगी निशुल्क उपलब्ध करून दिल्याचेही डांगे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Help from Delhi people for flood victims