सावधान! बंगळूर, बेळगावात हाय अलर्ट

वृत्तसंस्था
रविवार, 18 ऑगस्ट 2019

गुप्तचर विभागाच्या सूचनेनंतर बंगळूरसह बेळगावातील रेल्वेस्थानक, बसस्थानक, चित्रपटगृहे, शहरातील अधिक वर्दळीच्या ठिकाणी पोलिसांची नियुक्ती केली जात आहे.

बेळगाव : देशातील प्रमुख शहरांत घातपाताची शक्‍यता केंद्रीय गुप्तचर विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे बंगळूर, बेळगावात हाय अलर्ट घोषित करण्यात आला असून, पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. 

गुप्तचर विभागाच्या सूचनेनंतर बंगळूरसह बेळगावातील रेल्वेस्थानक, बसस्थानक, चित्रपटगृहे, शहरातील अधिक वर्दळीच्या ठिकाणी पोलिसांची नियुक्ती केली जात आहे. मोठे हॉटेल, हॉस्टेल, अपार्टमेंट, उच्चशिक्षण संस्था, मॉल आदी ठिकाणी खासगी सुरक्षारक्षक तैनात असल्याने त्यांना खबरदारी घेण्याची सूचना करण्यात आली आहे. बंगळूर, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्येही अतिदक्षता बाळगण्यात आली आहे. 

पर्यटनस्थळे, गर्दीच्या ठिकाणांवर नजर 
केंद्रीय गुप्तचर विभागाच्या निर्देशानुसार देशाची राजधानी नवी दिल्ली, देशातील प्रमुख वाणिज्य शहर मुंबई आणि हैदराबाद शहर, सिलिकॉन सिटी म्हणून प्रसिद्ध असलेले बंगळूर शहर आदी प्रमुख ठिकाणी घातपाती कृत्ये करण्याची दहशतवाद्यांची योजना आहे. पर्यटनस्थळे, लोकांनी गजबजलेली रेल्वे व बस स्थानके दहशतवाद्यांच्या टार्गेटवर आहेत. अशा ठिकाणी अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. गुप्तचर विभागाच्या नोटीसनंतर पोलिस आयुक्तांनी बंगळूरमध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: High alert in Bangalore and Belgaum