पीपीई किटच्या खरेदीत झाला भ्रष्टाचार; भाजप प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा

वृत्तसंस्था
Thursday, 28 May 2020

हिमाचल प्रदेशात पीपीई किटच्या खरेदीत भ्रष्टाचार झाला असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यामुळे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजीव बिंदल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशात पीपीई किटच्या खरेदीत भ्रष्टाचार झाला असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यामुळे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजीव बिंदल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पीपीई कीट खरेदी प्रकरणात झालेल्या भ्रष्टाचारात दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत हिमाचल प्रदेशातील आरोग्य यंत्रणेचे संचालक ए.के. गुप्ता यांना ताब्यात घेतले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची कसून चौकशी सुरु आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

या पार्श्वभूमीवर बुधवारी राजीव बिंदल यांनी आपण नैतिक जबाबदारी म्हणून पदाचा राजीनामा देत असल्याचे बिंदल यांनी सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याकडे राजीनामा सोपवला. हा राजीनामा तात्काळ मंजूरही करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या चौकशीत कोणताही अडथळा येऊ नये, असे बिंदल यांचे म्हणणे असले तरी पक्ष नेतृत्वाने राजीनामा तात्काळ मंजूर केल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 
------------
आरबीआय बॉँड्समध्ये गुंतवणूक करायची आहे? मग ही आहे शेवटची संधी...
------------
सीमेवरील परिस्थिती नियंत्रणात; चीनचे स्पष्टीकरण
------------

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. यामध्ये दोन व्यक्ती पाच लाखाची लाच देण्यासंदर्भात बोलत होत्या. या क्लीपच्या आधारे ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. या सगळ्या प्रकारानंतर हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शांता कुमार यांनी हा प्रकार लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे. परंतु, बिंदल यांनी या घोटाळ्याशी भाजपचा कोणताही संबंध नसल्याचे म्हणत त्यांनी बिंदल यांची पाटराखण केली आहे.

पेशाने डॉक्टर असलेले राजीव बिंदल हे पाचवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. या प्रकरणामुळे हिमाचल प्रदेशात भाजप पक्ष चांगलाच कोंडीत सापडला आहे. जे.पी. नड्डा यांनी जानेवारी महिन्यात राजीव बिंदल यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली होती. मात्र, अवघ्या १४३ दिवसांत त्यांच्यावर पदावरून पायउतार होण्याची वेळ आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Himachal BJP President Dr. Rajiv Bindal resigns