हुतात्मा जवानाच्या मुलीचा सर्व खर्च उचलू:आयएसएस दांपत्य

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 मे 2017

आम्ही तिच्या शिक्षणाचा व विवाहाचा सर्व खर्च करु. तिला प्रशासकीय अधिकारी व्हावयाचे असल्यास; वा तिच्या आवडीच्या कोणत्याही क्षेत्रात करिअर करावयाचे असल्यास आम्ही तिला मदत करु

शिमला - जम्मु काश्‍मीर राज्यामधील पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेल्या नायब सुभेदार परमित सिंग यांच्या 12 वर्षीय कन्येस हिमाचल प्रदेश केडरमधील राजपत्रित अधिकारी असलेल्या एका दांपत्याने "दत्तक' घेण्याचा निर्णय घेतला आहे. या कन्येच्या शिक्षणासह तिच्या विवाहाचाही खर्च उचलण्याची तयारी कुलुचे उपायुक्‍त युनुस खान आणि त्यांची पत्नी व आयपीएस अधिकारी असलेल्या अंजुम अरा यांनी दर्शविली आहे. सिंग यांचा दहशतवाद्यांनी गेल्या 1 मे रोजी शिरच्छेद केला होता.

"खुशदीप (सिंग यांची कन्या) ही तिच्या कुटूंबीयांसमवेतच राहिल. मात्र आम्ही तिच्या शिक्षणाचा व विवाहाचा सर्व खर्च करु. आम्ही खुशदीपच्या समस्या जाणून घेण्यासाठी तिला वेळच्यावेळी भेटत राहू. तिला प्रशासकीय अधिकारी व्हावयाचे असल्यास; वा तिच्या आवडीच्या कोणत्याही क्षेत्रात करिअर करावयाचे असल्यास आम्ही तिला मदत करु,'' असे सोलन जिल्ह्याच्या अधीक्षक असलेल्या अरा यांनी म्हटले आहे.

खुशदीप हिला उत्तम शिक्षणाची सोय उपलब्ध करुन देण्यामधून आम्ही या देशाचे नागरिक म्हणून असलेले आमचे कर्तव्यच पार पाडत असल्याची भावना युनुस यांनीही यावेळी बोलताना व्यक्त केली.

Web Title: Himachal IAS-IPS couple to 'adopt' martyr Paramjit Singh's daughter