
सुखविंदर सिंग सुखू आज हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.
Himachal : प्रतिभा सिंहांना मागं टाकत CM पदाच्या शर्यतीत सुखविंदर यांनी मारली बाजी; जाणून घ्या 7 मुख्य कारणं
Himachal Pradesh Assembly Election 2022 : सुखविंदर सिंग सुखू आज हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. दोन दिवसांच्या अथक परिश्रमानंतर शनिवारी काँग्रेस हायकमांडनं त्यांच्या नावाला मंजुरी दिली. सुखू यांच्याशिवाय प्रतिभा वीरभद्र सिंह, मुकेश अग्निहोत्री हेही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते.
सुखविंदर सिंग सुखू मुख्यमंत्री का झाले?
सुखविंदर सिंग सुखू यांना हिमाचल विधानसभेतील निम्म्याहून अधिक विजयी काँग्रेस आमदारांचा पाठिंबा आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं 40 जागा जिंकल्या आहेत.
सुखू यांचा होम जिल्हा असलेल्या हमीरपूरमध्ये काँग्रेसनं चांगली कामगिरी केलीय. काँग्रेसनं इथं 5 पैकी 4 जागा जिंकल्या आहेत. पाचवी जागाही काँग्रेसच्या बंडखोरानं जिंकली. हमीरपूर हा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल यांचा गृह जिल्हा आहे.
सुखविंदर सिंग सुखू यांनी स्वत:ची वेगळी प्रतिमा निर्माण केलीय. त्यांनी आपल्या आयुष्याची सुरुवात विद्यार्थी राजकारणापासून केली. त्यांचे वडील ड्रायव्हर होते. संघटनेत त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. तर, प्रतिभा सिंह आणि मुकेश अग्निहोत्री यांनी वीरभद्र यांच्या छताखाली राजकीय कारकीर्द सुरू केली.
सुखू यांचा मूळ प्रदेश हमीरपूर हा मध्य हिमालयाचा आणि मोठ्या कांगडा प्रदेशाचा भाग आहे. वीरभद्र सिंह यांच्यावर अनेकदा शिमला आणि वरच्या डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांची बाजू घेत असल्याचा आरोप करण्यात आला. प्रतिभा सिंह यांना 'राणी' असंही संबोधलं जात होतं. त्याच वेळी, सुखू यांना मुख्यमंत्री बनवल्यानं आता पक्षाला व्यापक प्रादेशिक पोहोच मिळणार आहे.
हेही वाचा: Telangana Police : आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची बहीण शर्मिला रेड्डींना अटक; पोलिसांची मोठी कारवाई
सुखविंदर सिंग सखू यांना हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री करून काँग्रेसनं जातीय समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे.
सुखू यांना फायरब्रँड नेता मानलं जातं. कॉलेजच्या दशेपासून ते आक्रमक आहेत.
सुखू हे राहुल गांधींच्या टीममधील सदस्यांपैकी एक आहेत. त्यांचं वय सध्या 58 वर्षे आहे. त्यांना मुख्यमंत्री करून काँग्रेसनं सामान्य कार्यकर्ताही मुख्यमंत्री होऊ शकतो, असा स्पष्ट संदेश दिला आहे.
हेही वाचा: सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?
हिमाचलमध्ये भाजपला मिळाल्या 25 जागा
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत 40 जागा जिंकून काँग्रेस 5 वर्षानंतर सत्तेत परतली आहे. तर, भाजपला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. मात्र, आम आदमी पक्षाला इथं खातंही उघडता आलं नाही.